गुन्हे शाखा पथकाची कारवाई
गोंदिया : गोंदिया शहरातील रामनगर पोलिस ठाणे व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा व इतर अंमली पदार्थाचा सेवन करून गुन्हे करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पथकासह रामनगर व शहर पोलिसांनी संयुक्तरित्या छापामार कारवाई केली. या कारवाईत दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 20 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. यावेळी आरोपींकडून अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील विषेशतः गोंदिया शहर, रामनगर, परिसरात घडणाऱ्या घटना चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण व नवयुवक आणि अल्पवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढता कल लक्षात घेता नशापाणी करून अंमली पदार्थ (गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ) चा वापर करून गुन्हे करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश लबडे, यांना गोंदिया शहर, रामनगर, परिसरात अंमली पदार्थांचा वापर करून नशापाणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलिस ठाणे गोंदिया शहर व रामनगर पोलिसांचे पथके तयार करून 23 ते 25 मे या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये अंमली पदार्थांचा वापर व सेवन करणाऱ्याविरुद्ध कलम 27 अमली पदार्थ अधिनियम 1985 कायद्यान्वये पोलिस ठाणे गोंदिया शहर येथे 18 व रामनगर पोलिसात 2 अशा 20 जणांवर गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून अंमली पदार्थाचे साहित्य व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत रामनगर व शहर परिसरातील वैभव उमेश पोगडे (वय 22 रा. शेंदुरवाफा, ता. साकोली, जि. भंडारा, ह.मु गौतमनगर), जय सुरेश नागरीकर (वय 26), रोहन भागवत बागडे (वय 24) दोघेही राहणार छोटा गोंदिया, शेखर रामप्रसाद घारपिंडे (वय 40 रा. श्रीनगर), ऋषी दिलीप तिवारी (वय 20 रा. रामनगर), सुजान शाहरुख खान (वय 18 रा. आंबाटोली), आयुष राधेश्याम भालाधरी (वय 18 रा. सिंगलटोली), रामदास बुधराम कावडे (वय 42), जितेंद्र शालिकराम नागभीरे (वय 46), जयंत गणपत राऊत (वय 48), तिघेही राहणार गौतम नगर, आकाश किशोर बावणे (वय 20), सागर कैलास वाघमारे (वय 28) दोघेही राहणार यादव चौक, गोंदिया, हिमांशू प्रकाश पटले (वय 28), सुबोध भूषण बोपचे (वय 34) दोघेही राहणार टी.बी टोली, गोंदिया, बबलू श्यामकिशोर अरखेल (वय 23 रा. सिंधी कॉलनी), वरूण राजकुमार समुद्रे (वय 22 रा. भीमनगर), राकेश परसराम चंदनिया (वय 28 रा. सरकारी तलाव हनुमान मंदिर जवळ), अमर महादेव गजभिये (वय 40 रा. कचरा मोहल्ला), राकेश हेमराज गोंडाणे (वय 40), आदिल अश्फाक शेख (वय 20 ) दोघेही राहणार सावराटोली, गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत.