जीर्ण आणि धोकादायक पूलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वरवर रस्ता दुरूस्ती करणारे रस्ता बांधकाम विभाग अजूनही झोपेतच
रस्ता बंद झाल्याने नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि वाहन धारकांची कुचंबना
गोंदिया : देवरी ते चिचगड गावाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ वरील सालई-अब्दुलटोला दरम्यान असलेला जीर्ण पूल अखेर आज सकाळी ६ वाजे दरम्यान कोसळला. परिणामी, या मार्गावरील रहदारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून राष्ट्रीय महामार्ग असल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले असून जून्या जीर्ण आणि धोकादायक पुलांच्या ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, निवडणुकीवर डोळा असल्याने विविध भूमिपूजन कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त असलेले आजी माजी आमदार-खासदार हा विषय कसा हाताळतात, तेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.दरम्यान आमदार सहसराम कोरेटे यांनी घटनास्थळी धाव घेत संबधित विभागाच्या अंभियंत्याना पाचारण करुन तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
सविस्तर असे की, नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील देवरी येथून बालाघाट- आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्र ५४३ हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर अनेक ठिकाणी जूने जीर्ण झालेले पूल आहेत. या जीर्णावस्थेत गेलेल्या पूलांची दुरूस्ती न करता वरून रस्ते बांधकामांवर शासनाचा निधी उधळला जात आहे. रस्ते दुरूस्ती करताना या पूलांचा स्ट्रक्चरल ऑडीट संबंधित विभाग करतो की नाही, हे गुलदस्त्यातच आहे. वरवर रस्ता दुरूस्ती करून नेते अधिकारी मलई वाटून मोकळे होत असल्याचे आरोप काही नवीन राहिले नाहीत. मात्र, यामुळे रस्ता अपघात होण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक प्रकार आज सकाळच्या सुमारास घडला. देवरीवरून सुमारे ५ किमी अंतरावर सालई आणि अब्दुलटोला दरम्यान एक जीर्ण पूल आहे. त्या पुलावरील संरक्षक कठडा सुद्धा काही वर्षापूर्वीच तुटला आहे. असे असताना त्या पुलाची दुरुस्ती करण्याचे साधे सौजन्य शासन-प्रशासनाने दाखविले नाही. यावरून आदिवासी मागास भागातील जनतेच्या जिविताची काळजी शासन कशी घेते, हे स्पष्ट होते. हा पूल सकाळी ६ वाजे दरम्यान कोसळला. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने संभाव्य अपघात टळले. मात्र, देवरी कडून चिचगडच्या दिशेने जाणारा एक ट्रक त्या कोसळलेल्या पूलावरून उसळून दुसऱ्या बाजूला निघून गेला. संबंधित वाहन वेगात असल्याने तो पूलाच्या दुसऱ्या बाजूला निघाला. त्यापूर्वी चिचगड कडून येणाऱ्या दोन दुचाकींपैकी एक त्या कोसळलेल्या पूलात घुसली. दुचाकीस्वाराचे आपल्या वाहनावर नियंत्रण असल्याने संभाव्य अपघात टळला. तर मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या मदतीने खाली पडलेल्या दुचाकीला काढण्यात यश आले. दरम्यान, हे दोन्ही वाहनचालक आपली गाडी नाल्यातून काढत असताना देवरीकडून वेगाने जाणारा वाहन अखेर नाल्यात घुसला. मात्र वाहन वेगात असल्याने तो वाहन दुसऱ्या बाजूला निघण्यात यशस्वी झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सदर पूल कोसळण्याच्या प्रक्रियेला काल सायंकाळपासूनच सुरवात झाली होती. हा पूल रात्री कोसळला असता तर अनेक वाहनांचा याचा फटका बसून मोठ्याप्रमाणावर जिवीत आणि आर्थिक नुकसान झाले असते.
हा महामार्ग नक्षलग्रस्त, आदिवासी, मागास आणि अतिसंवेदनशील भागातून जात असतो. तसेच चिचगड ते देवरी या दोन गावांना जोडणारा प्रमुख जडवाहतुकीचा मार्ग आहे. या प्रमुख मार्गावरून विकासाच्या पोकळ बाता करणारे गडचिरोली लोकसभा आणि देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रातील स्वयंघोषित विकास पुरूष सुद्धा ये जा करीत असतात. आज अपघात ग्रस्त झालेल्या पूलाची निर्मितीला सुमारे ७० वर्षाचा कालावधी झाल्याचे सांगितले जात आहे. आजच्या परिस्थितीमधे या रस्त्यावरून भारी जडवाहने मोठ्या प्रमाणावर जातात. अशात या मार्गावरील एका ही पूलाची भारसहन क्षमता वाढविण्याचा विचार करण्यात आलेला दिसत नाही. केवळ वरवर दुरुस्ती करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे आजचा प्रसंग ओढविला गेल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आतातरी या भागातील राजकीय मंडळी आणि बांधकाम विभाग आजच्या घटवेवरून धडा घेतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्याच्या दिवसात सदर पूल कोसळ्याने या रस्तावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनचालक, रुग्णसेवा आणि शालेय विद्यार्थी यांचे समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबीचा विचार करून शासन तात्पुरती का होईना, काही व्यवस्था करून शासनाने मार्ग काढावा, अशी रास्त मागणी होत आहे.