गोंदिया : जंगल शिवारातील नाल्यावर आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा मंगळवारी (दि.३) दुपारी बुडून मृत्यू झाला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील मशानझुरवा जंगल परिसरात घडली. पंकज छबिलाल गजभिये (वय २३ रा. बाम्हणी ता. सडक अर्जुनी) असे या युवकाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने बाम्हणी गावात शोककळा पसरली आहे.
पोळ्याचा पाडवा असल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथील काही युवक जवळील खडकीटोला परिसरातील मशानझुरवा जंगल शिवारातील नाल्यामध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी पंकज गजभिये हा देखील मित्रांसोबत आंघोळीसाठी नाल्यावर गेला. मात्र, आंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती देवरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंकजचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत मोठी गर्दी केली होती.
दोन महिन्यापूर्वीच वडिलांचा अपघाती मृत्यू
पंकजच्या वडिलांचा दोन महिन्यापूर्वीच अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पंकजच्या खांद्यावर होती. त्यातच ऐन सणासुदीच्या दिवशीच पंकजचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.