Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedउत्पन्न वाढीचा जिल्हा विकास आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी गोतमारे

उत्पन्न वाढीचा जिल्हा विकास आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी गोतमारे

मानव विकास निर्देशांक वाढीवर भर द्या
कृषि, आरोग्य, रोजगार व पर्यटनाला प्राधान्य
जिल्हा विकास आराखडा आढावा
गोंदिया : जिल्ह्याच्या विकासासाठी धोरणात्मक व अंमलबजावणी आराखडा तयार करावयाचा असून त्यामध्ये कृषि व संलग्न सेवा, उद्योग, जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन व इतर क्षेत्राचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. सदर जिल्हा विकास आराखडा तयार करतांना विविध शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी आवश्यक त्या कार्यप्रणालीचा या आराखड्यात समावेश असणे आवश्यक आहे. याशिवाय जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी शिक्षण, आरोग्य व उत्पन्नवाढ या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास आराखडा बैठकीत ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, सिम्बॉयसिस स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स पुणे येथील डॉ. निहारिका सिंग, डॉ. सुदिपा मजुमदार, डॉ. चांदणी तिवारी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुध्दा साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्हा या घटकावर केले आहे. विविध जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी “जिल्हा विकास आराखडा” तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गोंदिया जिल्हा विकास आराखडा तयार करतांना सकल जिल्हा उत्पन्न व त्यामध्ये पुढील पाच, दहा व पंधरा वर्षाच्या कालावधीत अपेक्षित असलेली वाढ यावरही लक्ष केंद्रित करण्यात यावे असे जिल्हाधिकारी म्हणाले. गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. तसेच आपल्या जिल्ह्यात पर्यटनाला खूप वाव आहे. या बाबीचे प्रतिबिंब आराखड्यात असावे असे त्यांनी सांगितले. आपल्या जिल्ह्याचे विश्लेषण करुन आपले बलस्थाने, उणिवा, संधी आणि धोके ओळखणे आवश्यक असून प्रत्येक विभागाने सॉट विश्लेषण (SWOT Analysis) करावे. सदर सॉट विश्लेषण करण्याकरीता संबंधित भागधारकांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे तज्ञांची मते, विभागांच्या सूचना व नागरिकांचे अभिप्राय देखील घेण्यात यावेत. जिल्ह्याचे सॉट विश्लेषण केल्यानंतर जिल्ह्यामध्ये संभाव्य गुंतवणूकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या संधींचा अंदाज मिळू शकेल. याप्रमाणे तीन ते चार प्रमुख क्षेत्र निश्चित करुन त्यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रामधील उणिवांचा अभ्यास करुन जिल्हा विकास आराखड्यामध्ये त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments