गोंदिया. राष्ट्रीय महामार्गावरील कॅनरा बॅंकेचे एटीएम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या २४ तासाच्या आत मुसक्या आवळण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील कॅनरा बॅंकेचे एटीएम मशिन एका अज्ञात इसमाने त्याच्याकडील साहित्याचा वापर करून तोडण्याचा प्रयत्न गेल्या रविवारी (दि.२३) रोजी केला होता. पण त्या इसमाचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. या प्रकरणाची फिर्याद देवरी पोलिसांत करण्यात आली होती.
या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचे शोधकार्य गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे आणि देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांचे मार्गदर्शनाखाली देवरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे नेतृत्वात हवालदार परसमोडे, पोलिस नायक कांदे, शिपाई चव्हाण आणि डोहळे यांच्या चमूने पूर्ण केला. या पोलिस पथकाने केवळ २४ तासाच्या आत शोधकार्य पूर्ण करून सदर गुन्ह्यातील आरोपी पुरेंद्र उर्फ अनिल उर्फ बच्चा कमलेश शुक्ला (वय२३) राहणार मातोश्री नगर, हिंगणा रोड, वानाडोंगरी, नागपूर यांस ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद जाधव हे करीत आहेत. २४ तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याने देवरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.