नागपूर : कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील खाण क्रमांक सहा परिसरात झालेल्या बेछूट गोळीबारात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा (एमएसएफ) जवान जखमी झाला झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने ग्रामीण पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) असे जखमी जवानाचे नाव आहे.
मिलिंद यांच्यावर कामठीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (वय २९, रा. कॉलरी टेकडी) व राहुल जेकब (वय २६, रा. कांद्री) या दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी समीर व वेकोलिच्या इंदर कॉलनी परिसरात तैनात एका जवानाचा वाद झाला होता. त्यानंतर समीर हा या जवानाचा शोध घेत होता. रविवारी दुपारी मिलिंद हे परिसरात गस्त घालत होते. समीर व जेकब मोटारसायकलने या भागात संशयास्पदस्थितीत फिरताना मिलिंद यांना दिसले. मिलिंद यांनी त्यांना हटकले. दोघांनी मिलिंद यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला जाताच समीरने पिस्तुलातून मिलिंद यांच्यावर बेछूट गोळीबार केला. साथीदारासह समीर पसार झाला. माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी मिलिंद यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मिलिंद यांच्या डोक्यात दोन तर एक गोळी पोटात घुसली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी, उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागवान यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कन्हान गाठून घटनेची माहिती घेतली. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याचा शोध पोलिस घेत आहेत.