गडचिरोली : फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवाद्यास १८ एप्रिल रोजी अटक केली. साधु ऊर्फ संजय नरोटे (वय ३१) रा. झारेवाडा ता. एटापल्ली असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
१७ एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गट्टा (जां.) हद्दीतील मौजा हाचबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें गट्टा (जां.) येथील पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बलच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली साधु ऊर्फ संजय नरोटे यास अटक केली. तो सन २०१५ पासुन गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य या पदावर कार्यरत होता. २८ एप्रिल २०२३ रोजी तो नक्षल दलम सोडुन घरूनच नक्षलविरोधी कारवाया करीत होता. त्याच्यावर पोलीस पार्टीवर एम्बुश लावणे, जाळपोळ करणे, पोलीस व निष्पाप नागरीकांना जिवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरुपाचे २३ गुन्हे दाखल आहेत. त्यात १२ चकमक, २ पोलीस जवानांसहीत एकुण ८ खुन, २ जाळपोळ व १ दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली २०२०, कोदुर-२०२०, टेकामेट्टा – २०२१, गोरगुट्टा-२०२१, गुंडरवाही एम्बुश – २०२० या चकमकींमध्ये सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे- जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख त्यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक चाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
गडचिरोलीत एक जहाल नक्षलवादी अटक
RELATED ARTICLES