गोंदिया: ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार रोड दुर्गा ट्रेडर्स कबाडीच्या गोदामात २१ जुलैच्या दुपारी १२ वाजता आदर्श अनिल विश्वकर्मा २५ रा. गणेशनगर गोंदिया या तरुणाला मारहाण करून त्याच्या जवळून १८ हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले. त्या तरूणाला धक्काबुक्की करून त्यांच्या कबाडी दुकानाला कुलूप लावून दोन्ही बाजूच्या भिंतीवर ही जमीन आपल्या मालकीची असल्याचे दाखविणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी १ लाख रूपयाची मागणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातील ठाणेदाराचा रायटर बिजेंद्र धनलाल बिसेन (बक्कल नंबर १६०८) यांनी केली होती. या प्रकरणाची तक्रार पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्याकडे करण्यात आली होती.
या प्रकरणात त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, अनिल गयाप्रसाद विश्वकर्मा (५३) रा. गणेशनगर गोंदिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुर्गा ट्रेडर्स येथे कबाडीचे गोदाम त्यांनी तयार केले आहे. त्या जागेवर आरोपींनी आपला हक्क दाखवित असून तुम्ही आम्हाला २५ लाख रुपये द्या अन्यथा ती जागा आमची आहे आम्हाला परत करा असे बोलून आरोपी अरबाज उर्फ राजा अखिल शेख (३०), गणेश रामदयाल राऊत (२५), विनोद मेश्राम (३०) तिन्ही रा. गोंदिया व इतर १२ अशा १५ जणांनी त्यांना धमकाविले होते. २१ जुलै २०२३ रोजी आरोपीं त्यांच्या गोदामात गेले होते. त्यावेळेस आदर्श अनिल विश्वकर्मा (२५) हा तरुण गोदामात उपस्थित होता. गोदामातून त्याला धक्के मारून बाहेर काढले. गोदामाला कुलूप लावले. कबाडीचा व्यवसाय केल्यामुळे त्याच्या खिशात असलेले १८ हजार रुपये आरोपींनी घेतले. भिंतीवर ही जमीन आपल्या मालकीची आहे असे दाखवून तिथे आपल्या मोबाईल क्रमांक दर्शविला. या घटने संदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात १५ आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९५, ३२७, ३८५, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हैत्रे यांच्याकडे होता. त्यांचा रायटर बिजेंद्र धनलाल बिसेन (बक्कल नंबर १६०८) हा आरोपींसोबत काय बोलते हे माहित नव्हते. परंतु बिजेंद्र आपली पोळी शेकण्यासाठी आरोपींना गुन्ह्यातून सोडण्यासाठी त्यांच्याकडे १ लाख रूपयाची मागणी केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आल्याने या तक्रारीवरून पोलिस अधिक्षक निखील पिंगळी यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
विभागीय चौकशी सुरू
पोलीस हवालदार बिजेंद्र धनलाल बिसेन (बक्कल नंबर १६०८) याला निलंबित केल्यानंतर त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.