गोंदिया : देवरी पोलिसांनी जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान घेऊन जाणारे पाच संशयित ट्रक देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले आहे.ही कारवाई शनिवारी (दि.१४) करण्यात आली. मागील महिन्यात छत्तीसगड राज्यातील ईडीच्या पथकाने गोंदियातील धान्य खरेदी-विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना छत्तीसगड राज्यात झालेल्या धान घोटाळ्याच्या चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. त्या प्रकरणाशी हे तार जुळत असल्याची चर्चा आहे. शनिवारी (दि.१४) देवरी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील हे गस्तीवर असताना त्यांना देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील शिरपूरबांध येथील आरटीओ चेक पोस्टजवळ धान घेऊन जाणारे ५ ट्रक हे एकामागे एक जात असताना त्यांच्यावर संशय आल्याने ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात धान आढळून आले.
तर ट्रक चालक व राइस मिल मालकांवर होणार गुन्हा दाखल जिल्ह्यात सध्याच्या घडीला रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळ, तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला धान भरडाईकरिता राइस मिल मालकांना देण्यात येतो. छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव मिळत असल्याने राइस मिल मालक शासकीय धानाची विक्री करतात. बाहेर राज्यातील तांदूळ विकत घेत सीएम- आरच्या नावावर शासकीय गोदामात जमा करतात. यासंदर्भात देवरी पोलिस या ट्रकमध्ये असलेल्या धानाची चौकशी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडून करून घेणार आहेत.
तीन तालुक्यांतून जात होते पाच ट्रक
यासंदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या धानाच्या पोत्यावर महाराष्ट्र शासनाचा मार्क असल्याने हे धान शासकीय धान तर नाही ना याची चौकशी सुरू आहे. दोन ट्रक हे नवेगावबांध येथून आले आहेत, तर एक ट्रक सौंदड येथून आला आहे, तसेच दोन ट्रक हे आमगाव येथून छत्तीसगड राज्यात नेत असल्याची माहिती वाहन चालकांनी पोलिसांना दिली आहे.
“वाहतूक करण्यात येणारे धान शासकीय आढळल्यास ट्रक चालक आणि राइस मिल मालकांवर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात पुरवठा विभागाला पत्र देण्यात आले आहे. पुरवठा विभागाचे पत्र आल्यावरच ते धान शासकीय की खासगी, याचा उलगडा होऊ शकेल.”
– विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, देवरी