द्योग वाढीसाठी चर्चासत्र : बेरोजगारांना रोजगार मिळण्यास संधी
गोंदिया : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद घेण्यात आली. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत 09 उद्योग घटकांसाठी 666.50 कोटींचे सामंजस्य करार झाले. यातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यास संधी उपलब्ध होणार असून उद्योग उभारतांना जिद्द, परिश्रम व चिकाटी कायम असू द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष हुकूमचंद अग्रवाल, राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, लाख उद्योग असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल, एमआयडीसीचे उपअभियंता श्री. हारगुळे, सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक रेखलाल टेंभरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भुनेश्वर शिवणकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, प्रथमच जिल्ह्यात गुंतवणूक परिषद होत आहे. गोंदिया जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून धान उत्पादक तसेच तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. सध्या गोंदिया जिल्ह्याचे राज्याच्या एकूण उत्पन्नामधील योगदान हे केवळ 0.7 टक्के एवढाच आहे. आपण 2027-28 पर्यंत हाच हिस्सा 1.3 टक्क्यावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून उद्योग क्षेत्रात गोंदिया जिल्ह्याचे नाव लौकीक करुन उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे. जिल्ह्यातील तरुणांची बेरोजगारी दूर करण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व इंडस्ट्रीजला जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल. जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील प्रलंबीत प्रकरणे निश्चितच निकाली काढली जातील. उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक भुमिका घेईल असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
उद्योग विभागामार्फत उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून गोंदिया हा विकासासाठी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मुनेश्वर शिवणकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील विविध उद्योगाबाबत सामंजस्य करार उद्योग कंपन्यांशी करण्यात आले. त्यामध्ये सुफलाम इंडस्ट्रीज लिमिटेड (335 कोटी) , गाव माझा उद्योग फाऊंडेशन (300 कोटी), लोया प्री-इंजिनियरींग बिल्डींग प्रायव्हेट लिमिटेड (12 कोटी), इंडियन ॲक्वा (0.5 कोटी) , श्री कान्हा ॲग्रो इंडस्ट्रीज (5.16 कोटी), पार्वती फुडस् ॲन्ड फीडस् (4.33 कोटी) , स्कुब डायग्नॉस्टीक सेंटर (5 कोटी), मिनाझ अल्ताफ हमीद इंडस्ट्री (2.0 कोटी), अलताफ अकबर अली हमीद इंडस्ट्री (2.50 कोटी) यांच्याशी एकूण 666.50 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते उद्योजकांना MOU (Memorandum Of Understanding) सामंजस्य करारपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कुणाल गोंडचवार, उद्योग निरीक्षक रवी किन्नाके, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक संगिता ढोणे, नियोजन विभागाचे विपुल खडतरे, स्मार्टच्या नोडल अधिकारी प्रणाली चव्हाण, कृषि अधिकारी पवन मेश्राम यांचेसह नविन उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिटकॉनचे जिल्हा समन्वयक विक्रांत बंसोड व एमसीईडी कार्यालयाचे सहायक शिशुपाल मानकर यांनी सहकार्य केले.