जिल्हा नियोजन आढावा : वेळेत खर्चाचे नियोजन करा
गोंदिया : जिल्हा नियोजन समिती मार्फत करावयाच्या विविध विकास कामाच्या निधी मागणीचे प्रस्ताव अंमलबजावणी यंत्रणांनी तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केल्या. गुणवत्तापूर्ण कामांसह निधी वेळेत खर्च करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीत बोलत होते.
खासदार प्रफुल्ल पटेल, खा. नामदेव किरसान, खा. डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, सहसराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, विशेष निमंत्रित सदस्य राजेंद्र जैन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, निमंत्रित सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तावर सविस्तर चर्चा करून ते कायम करण्यात आले. इतिवृत्तातील सिटी सर्व्हेचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आला. हा प्रकल्प पुढील पाच ते सहा महिन्यात मार्गी लागेल असे बैठकीत सांगण्यात आले. सिटी सर्व्हेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे असे पालकमंत्री म्हणाले. लाख लागवडीसाठी जिल्हाभर नियोजन करावे असे बैठकीत सांगण्यात आले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्र बाह्य योजना सन २०२३-२४ मध्ये यंत्रणांनी तिन्ही योजनांचा शंभर टक्के खर्च केला आहे. या खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सोलरवर आणाव्यात असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. सोबतच अर्धवट योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या.
गडकिल्ले व पर्यटन यावरील निधी तातडीने खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. यासोबतच या बैठकीत जिल्हा विकासाच्या विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गोंदिया शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जन सुविधा व नागरी सुविधा अंतर्गत कामे, जिल्हा क्रीडा संकुलातील कामे, खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ, काशिनाला व कुआढास नाला प्रकरण, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे रेडिऑलॉजिस्ट डॉक्टरची नियुक्ती करणे, गोंदिया रेल्वे स्टेशन सराफा लाईन जवळ पोलीस चौकीची मागणी आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद हिंदी पुर्व माध्यमिक शाळा दासगाव खुर्द येथील पाण्यात बुडून मरण पावलेल्या दोन विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रत्येकी दहा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. ओबीसी वसतिगृहाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जागा उपलब्ध झाली असून निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्हा नियोजन समिती सभा 23 डिसेंबर 2023 च्या इतिवृत्तास या बैठकीत मंजूरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत माहे मार्च 2024 अखेर झालेल्या खर्चासही मान्यता प्रदान करण्यात आली. सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा माहे जुलै 2024 अखेर पर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र). जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या अनुषंगाने कामांना मंजुरी प्रदान करणे व अध्यक्ष महोदयांचे परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा झाली.सभेचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे यांनी केले.
निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करा : पालकमंत्री
RELATED ARTICLES