गोंदिया : जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला कालपासून सुरुवात झाली. लाखो भाविकांनी हर हर महादेव म्हणत भगवान भोलेबाबाचे दर्शन घेतले. प्रतापगड येथे सुमारे 300 वर्षांपूर्वी गोंड राजाचे शासन होते. त्या काळातच याठिकाणी येथील डोंगर फोडून प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून याठिकाणी यात्रा भरते. येथे सर्व जाती-धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. पूर्व विदर्भातील हिंदू-मुस्लीम बाधवांच्या एकात्मतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रतापगडची यात्रा प्रसिद्ध आहे.
भाविकांची कालपासूनच हजेरी
गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने प्रतापगडची यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळं यंदा या यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. आज महाशिवयात्री असल्याने गर्दी होती. पण, कालही काही भाविक महादेवाच्या यात्रेला गेले होते. नवस बोलण्याची प्रथा आहे. आपली इच्छा पूर्ण झालं की, भाविक महादेवाला जातात.
पाच दिवस चालते यात्रा
मोरगाव अर्जुनी तालुक्यातील प्रतापगड येथे सुमारे पाच दिवस यात्रा भरते. दोन दिवस झालेत. आणखी तीन दिवस ही यात्रा सुरू राहील. राज्यातून तसेच परराज्यातूनही महादेवाला मानणारे भाविक येथे येतात. महादेवाची मनोभावे पूजा करतात.
महादेवाच्या मूर्तीपुढं भाविक नतमस्तक
विद्यमान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या ठिकाणी बऱ्याच सोयीसुविधा केल्या. त्यामुळं भाविकांना सुविधा मिळत आहेत. बऱ्याच बसडेपोमधून प्रतापगडसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. एक ते दीड तास उंच ठिकाणी चालून गेल्यानंतर तिथं महादेवाची मोठी मूर्ती आहे. या मूर्तीपुढं भाविक नतमस्तक होतात. विशेषताः पिवळे कपडे घालून भाविक या यात्रेस सहभागी होतात.
नागरा येथील पंचमुखी मंदिर
गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील प्रसिध्द असलेले प्राचीन पंचमुखी मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त रात्री १२ वाजल्यापासून भक्तांनी गर्दी केली. नागरा येथील पंचमुखी शिवलिंगाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. भाविक दर्शन घेण्यासाठी रांगेत लागून दर्शन घेतात. मंदिराचे गाभारे आज रात्री १२ वाजतापासूनच भक्तांसाठी खुले करण्यात आले. मात्र, गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला. भाविक दुरूनच पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतात.