देवरी तालुक्यातील गोठाणपार येथील दुर्दैवी घटना
गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ककोडी क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत गोठाणपार येथे (दि.१९) रोजी लग्नकार्यात आलेल्या एका १२ वर्षीय चिमुकल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमाणूस अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने केवळ देवरी तालुकाच नव्हे तर अवघा गोंदिया जिल्हा हादरलेला असतानाच चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत य़ेत असलेल्या भसबोडन येथे एका युवकाने आत्ममहत्या केल्याची घटना उघडकीस आली असून सदर युवकाचे गोठाणपार येथील प्रकरणाशी संबध असल्याची चर्चा जनमाणसात सुरू झाली आहे.तर काही नागरिकांच्या मते सदर युवकाला दारुचे व्यसन असून तो त्या लग्नकार्यात सहभागीच झाला नव्हता अशीही चर्चा आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मौजा गोठाणपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी व देवरी तालुक्यातील गोठाणपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचे काल १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता लग्न आयोजित करण्यात आले होते. या लग्न सोहळ्याला आलेल्या सहाव्या वर्गात शिकत असलेली पिडीत अल्पवयीन बारा वर्षीय मुलगी आलेली होती. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेवून नराधमांनी त्या चिमूकलीचे अपहरण करून गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला. यानंतर तिच्या डोक्यावर जबर मारहाण करून हत्या केल्याची विदारक घटना २० एप्रीलला समोर आली होती.त्या घटनेच्या तपासाकरीता विविध पथक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गगदर्शनात तयार करुन तपास सुरु करण्यात आले. य़ाप्रकरणात ४० च्या वर लोकांची चौकशी करण्यात आली असून पोलीस तपास सुरू असतानाच भसबोडन येथील युवकाच्या आत्ममहत्येने सदर प्रकरणाशी संबध जोडले जात असल्याची कुजबूज असून पोलीस याप्रकरणात मात्र सत्यता तपासण्यात व्यस्त असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याकरीता विविध पथकाच्या माध्यमातून तपासाची चक्रे चिचगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात फिरवली आहेत.