राज्य राखीव पोलीस बल क्रीडा स्पर्धा समारोप
गोंदिया : आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही अशी आपली नेहमीच तक्रार असते. मात्र कामाचा ताण कमी करण्यासाठी खेळा सारखा उत्तम प्रकार कुठलाच नसून प्रत्येकाने आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खेळाचा छंद जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
भारत राखीव बटालियन क्रमांक दोन, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १५ गोंदिया येथे ११ व्या आंतर कंपनी क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे नगरपरिषद गोंदियाचे मुख्याधिकारी करण चव्हाण, विविध शाळांचे प्राचार्य, शेजारील गावातील सरपंच उपस्थित होते.
16 ते 18 ऑगस्ट 2023 पर्यंत भारत राखीव बटालीयन परसवाडा बिरसी च्या प्रांगणात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारत राखीव बटालियनच्या संपूर्ण जवानांनी भाग घेतला. विविध सांघिक खेळा सोबतच वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे जवानांकरिता आयोजित करण्यात आले होते. प्रामुख्याने फुटबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, हॉकी, खो-खो, कबड्डी इत्यादी सांघिक तसेच गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी यासह धावण्याच्या संपूर्ण शर्यती २१ किलोमीटर मॅरेथॉनचे सुद्धा आयोजन या क्रीडा स्पर्धेत करण्यात आले.
जवानांसोबतच कुटुंबियांकरिता सुद्धा मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांकरिता संगीत खुर्ची, छोट्या मुलींकरिता नींबू चमचा, बारा वर्षावरील मुलांकरिता पोतदार तर निमंत्रित पाहुणे मंडळी व गटातील पोलीस अधिकारी यांचेकरिता दोरीखेच या खेळाचे आयोजन केले होते. या संपूर्ण क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन संपूर्ण जवानांनी या क्रीडा स्पर्धांचा आस्वाद घेतला.
गटाचे समादेशक अमोल गायकवाड यांच्या अत्युत्कृष्ट नियोजनामध्ये या संपूर्ण क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गटाचे समादेशक सहाय्यक प्रमोद लोखंडे, सहाय्यक समादेशक मंगेश शेलोटकर, कैलास पुसाम, के.बी. सिंग, श्रीकृष्ण हिरपूरकर यांनी विशेष तयारी करून घेतली होती. ग्राउंड मार्किंग पासून तर संपूर्ण क्रीडा स्पर्धांच्या योग्य नियोजनाकरिता जबाबदारीचे वाटप संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांना करून देण्यात आले होते. जिल्हा पोलीस दलाची सुद्धा क्रीडा स्पर्धांचे आयोजनामध्ये विशेष मदत प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या सांगता समारंभात विशेष प्रस्तुती के.के. इंग्लिश स्कूल आमगाव येथील विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर समूह नृत्य हे होते. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी जवान यांचेकरिता आदित्य टाटा कार्स नागपूर यांचे तर्फे टी-शर्ट्स तथा भुवन सिंग रहांगडाले यांचे कडून बक्षिसांचे प्रायोजकत्व देण्यात आले होते. सांगता समारंभाचे वेळी गटाचे समादेशक यांनी प्रास्ताविक भाषणात खेळाचे महत्व किती आवश्यक आहे व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय फायदा होतो याचे महत्त्व विशद केले. प्रमुख अतिथी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन गौरव केला. याप्रसंगी बटालियन शेजारील छीपिया या गावातील प्रेरणा माहूरकर हिने नीट 2023 या परीक्षेत कठोर परिश्रम करून यश संपादन केल्याने तिची निवड वैद्यकीय शिक्षणाकरिता पुणे येथील शासकीय महाविद्यालयात झाल्याने तिचे व तिच्या पालकांचा बटालियन तर्फे सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रिया मंडल हिने वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग या स्पर्धेत जम्मू कश्मीर या ठिकाणी भारताचे प्रतिनिधित्व करून गोल्ड मेडल मिळविल्याने तिचा सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर खेळाडूंचे सुंदर असे मार्च पास बक्षीस वितरण व विविध कार्यक्रमाचा सोहळा अतिशय मोहक पद्धतीने साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचलन पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समादेशक सहाय्यक प्रमोद लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गटातील संपूर्ण पोलीस अधिकारी, अमलदार, अनुगामी कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वी केला.
मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक : अनिल पाटील
RELATED ARTICLES