लाचखोर उपकृषी अधिकारी रमेश टाकरस एसीबीच्या जाळ्यात

0
182

गोंदिया : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी लाच मागणाऱ्या उपकृषी अधिकाऱ्याला 5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कारवाई शुक्रवार, 16 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली. सालेकसा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी (वर्ग–3) रमेश मारोतराव टाकरस (वय 50) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार शेतकऱ्यांकडे 5 एकर शेती असून शेतीकामासाठी ट्रॅक्टर आहे. PMKSY वैयक्तिक लाभार्थी योजना 2.0 अंतर्गत ट्रॅक्टर रोटावेटरसाठी केंद्र शासनाकडून 40,000 रुपये अनुदान मिळते. त्यासाठी तक्रारदारांनी दिनांक 17 जून 2025 रोजी गोंदियातील शिव अग्रो येथून 1 लाख 5 हजार रुपयांचा रोटावेटर खरेदी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सालेकसा येथे सादर केला होता. आरोपी उपकृषी अधिकारी रमेश टाकरस यांनी अर्ज मंजूर करून अनुदान मिळवून देण्यासाठी सुरुवातीला 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अनुदान रक्कम दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतरही आरोपीने लाच देण्याचा तगादा लावला. अखेरीस 12 जानेवारी 2026 रोजी पैसे घेण्यासाठी बोलावले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर ACB पथकाने दिनांक 12 व 16 जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली. सापळा कारवाईदरम्यान आरोपीने 5 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवून प्रत्यक्ष स्वीकारली, त्यावेळी त्याला पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपीकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई गोंदिया ACB चे पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांच्या नेतृत्वात चंद्रकांत करपे, संजय बोहरे, मंगेश कहाळकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, संगीता पटले, रोहिणी डांगे, दीपक बाटबर्वे यांनी केली. संपूर्ण पथकाला नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here