गोंदिया : रेल्वे रुळापासून ३५ फूट दूर अंतरावरील झुडपात शरीरापासून डोके नसलेला मृतदेह ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आढळला. मृतदेहाचे डोके वेगळे, जबडा वेगळा आणि धड झाडाच्या झुडपात आढळले.त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तरी घातपाताच्या दृष्टीने तपास सुरू आहे. भोजराज दयाराम मते (वय ३२, रा. मौदा, ता. किरणापूर, बालाघाट) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजाभाऊ कॉलनी गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रेल्वे रुळालगत एक नाला आहे.
या नाल्याजवळ ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. रेल्वे खांब क्रमांक १००४/१० च्या मध्ये रेल्वे ट्रॅकपासून ३५ फूट लांब झुडपात नाल्याच्या बाजूला एक इसमाचा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाचे धड एका झाडाच्या झुडपात आढळले. त्या धडापासून डोके आणि जबडा वेगळ्या ठिकाणी पडलेला आढळला. हा प्रकार घातपात असण्याची दाट शक्यता आहे. भोजराज दयाराम मते हे नागपूरच्या एमआयडीसीमध्ये काम करीत होते. ते नागपूरवरून गावाला जाण्यासाठी गोंदियाला आले. परंतु, ते गावाला जाऊच शकले नाही. त्यांच्या गावाच्या रेल्वे रुळाच्या झुडपात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेसंदर्भात गौरीशंकर सुरजलाल पारधी (वय ४३, रिंग रोड गोंदिया) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार भोंडे करीत आहेत.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
मागील आठ दिवसांपूर्वीपासून तो मृतदेह पडून असल्याने कुजलेल्या स्थितीत आढळला. गावाला जाण्यासाठी निघालेल्या भोजराज दयाराम मते हे घरी पोहोचलेच नाहीत. त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत नातेवाइकांच्या हातात लागला.