गोंदिया : राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून लवकरच हा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा यासाठी प्रत्येक विभागाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिले. शासकीय योजनांची जत्रा याबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त येणाऱ्या योजना व त्यांच्या लाभार्थींची तात्काळ यादी बनवावी. लाभार्थींची निवड तातडीने करावी. प्रलंबित अर्ज निकाली काढावे. लाभार्थ्यांकडून योजनेचे अर्ज भरून घ्यावे. नवीन अर्ज स्वीकारावे, ज्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरले जातात अशा गरजूंना अर्ज भरण्यासाठी मदत करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. हा उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर राबविण्यात येणार आहे. प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत, हे हेरून शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रूपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत. या जत्रेनुसार सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी. योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबतही तयारी करावी.
लाभार्थींना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून या उपक्रमात सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी येऊन गरजूंना शासकीय योजनेचा लाभ देणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेत एकाच योजनेचा लाभ मिळणार नसून यामध्ये त्या कुटुंबाला अन्य योजनांचीही माहिती होणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ एकाच गरीब कुटुंबाला झाल्यास ते कुटुंब दारिद्रयरेषेच्या वर यायला हातभार लागणार आहे. यामुळे या जत्रेत प्रत्येक विभागांनी आपल्या विविध योजनांबाबत माहितीही पुस्तक रूपाने प्रसिद्धीस देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत. सर्व नियोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून गावपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मार्फत योजनांची माहिती ‘हर घर दस्तक’च्या रूपाने देता येणार आहे. यामध्ये सर्व यंत्रणांचा समावेश राहणार आहे. यासोबतच सीएससी सेवा सेंटर, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागांनी त्यांच्या पात्र लाभार्थ्यांची निवड करून योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या योजनांचा मिळणार लाभ
सीमांत शेतकरी गट बांधणी व गटनोंदणी, कृषी अभियांत्रिकीकरण योजना, शेती कीट, बाजार कीट, फवारणी कीट, इ-श्रम कार्ड, स्वनिधी योजना, इमारत बांधकाम योजना, रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्न, जन्म व मृत्यू इत्यादी दाखले, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बचतगटांना लाभ, हेल्थ कार्ड, गायी, म्हशी व शेळी मेंढी वाटप, महिलांना शिलाई मशीन वाटप, महालँब योजना, रोजगार मेळावा, वीज जोडणी, माती परीक्षण, अण्णासाहेब पाटील व इतर महामंडळांच्या योजना, शिकाऊ चालक परवाना, दिव्यांग साहित्य वाटप, महिलांना ‘सखी’ कीट वाटप, डिजिटल इंडिया अंतर्गत शासनाच्या डिजिटल सुविधांची माहिती व प्रशिक्षण, कृषी प्रदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट बाजारपेठ, नव मतदार नोंदणी, मुलींना सायकल वाटप, मनरेगा, जि.प. व कृषी विभाग विभागाच्या घरकुल योजना, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग, विवाह नोंदणी, पी.एम. किसान योजना, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, शासकीय कर्मचारी आस्थापना विषयक प्रलंबित बाबी व सेवानिवृत्ती विषयक लाभ व कृषी सेवा केंद्राचे परवाने यासह इतर सर्व शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन
वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या ज्या शासकीय योजनेचा लाभ नागरिकांना घ्यावयाचा आहे त्यासाठी तात्काळ त्या विभागाकडे अर्ज करावा. ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमात लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावा. जनकल्याणाच्या सर्व योजना शासन आपल्यापर्यंत पोहोचविणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.