विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
गोंदिया : उन्हाळा तोंडावर असताना आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडल्याचे पहायला मिळतेय. अशातच आता पुढचे ४ दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
गोंदिया जिल्ह्यात आज, १८ मार्च रोजी सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात पावसाने धडक दिल्यामुळे उन्हाळी पीक धोक्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरबऱ्यासह आंबा मोहराला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला असल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. दोन दिवसापासून असलेले खराब वातावरण लवकरच निवळले नाही तर पीक धोक्यात जाईल त्याबरोबरच आंब्याचेही मोठे नुकसान होईल.