जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे यांची तत्परता; जाणून घेतल्या समस्या
गोंदिया : मतदार संघातील फुलचुर आंबाटोली येथील नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आपल्या भागातील असलेल्या समस्या अवगत करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खुद्द जि. प. बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी मीच येतो असे सांगत मोक्यावर येत कॉलनी वासियांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. तसेच त्वरित समस्या निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद येथे फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधित्व बांधकाम सभापती संजय टेंभरे करीत आहेत. या क्षेत्रातील फुलचुर व फुलचुर टोला या दोन मोठ्या ग्रामपंचायती शहराला लागून असल्याने निमशहरी भागात मोडतात. नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. असे असूनही अजूनही या भागात रस्ते, नाली व सांडपाण्याची समस्या आ वासून उभी आहे. फुलचुर आंबाटोली येथील सेव्हन हिल्स कॉलनी येथे मागील आठ ते दहा वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र अजूनही या ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्ता, नाली व सांडपाण्याची कोणतीच व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही. वारंवार याबाबत पाठपुरावा केला तरी या भागातील नागरिकांना कोणतीच सुविधा मिळाली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविले. यासाठी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी चर्चा करून येत असल्याचे सांगितले. मात्र संजय टेंभरे यांनी तुम्ही त्रास करून घेऊ नका, मीच मोक्यावर येतो व शक्य होईल ती मदत करण्याचे आश्वासन देत अवघ्या काही तासातच आंबाटोली येथील सेव्हन हिल्स कॉलनी येथे भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सेवानिवृत्त माजी सैनिक बाबुलाल मेश्राम, पोलिस कर्मचारी आशिष पडोळे, खोमेश पटले, भागचंद्र रहांगडाले, सुनील रहांगडाले, रोहित रामटेके, माजी सैनिक शेखर खोब्रागडे, माजी सैनिक उईके आदी उपस्थित होते. यावेळी दोन महिन्याच्या आत सदर रस्ता बांधकाम करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
समस्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी अन् जिल्हा परिषद सभापती टेंभरे पोहोचले मोक्यावर!
RELATED ARTICLES