गोंदिया : महाराष्ट्र हे विकसनशील राज्य असून लोककल्याणकारी योजना राबविण्यात आपले राज्य देशात अग्रेसर राहिले आहे. शेवटच्या माणसाचा विकास हे ध्येय समोर ठेवूनच आजपर्यंत राज्याची वाटचाल राहिली आहे. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन सर्वसामान्य नागरिकांचा विकास व जिल्ह्याची प्रगती हेच प्रशासनाचे ध्येय असेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हावासीयांना दिली. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जिल्हावासीयांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पोलीस कवायत मैदान कारंजा-गोंदिया येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, भारतीय राखिव बटालियनचे समादेशक अमोल गायकवाड, अपर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक यावेळी उपस्थित होते.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होईल. शासनाने घोषित केल्याप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 15 हजार रुपये बोनस देण्यात येत आहे. शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 12 हजार शेतकऱ्यांना 166 कोटी प्रोत्साहन राशी अदा करण्यात आलेली आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कमेत शासनाने दुप्पट वाढ केली आहे. कोतवालांचे मानधनात वाढ करून आता 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये तिकीट दरात महिलांना सरसकट 50 टक्के सुट देऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीकविमा काढता येणार आहे ही बाब शेती विकासाला चालना देणारी आहे. शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात आणली असून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा देण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात शासनाकडून भरीव वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहे. या योजनेत अल्प उत्पन्न असलेल्या पिवळा व सेंदरी कार्डधारकांना लाभ देण्यात येतो. मार्च 2023 पर्यंत 35 हजार 183 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 108 वैद्यकीय आपातकालीन सेवेचा 1 लाख 60 हजार 796 लोकांनी लाभ घेतलेला आहे. संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत आता 1500 रुपये अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त घरकुल पुर्ण केल्यामुळे महाआवास-1 मध्ये गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षीत बेरोजगार नवयुवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने ‘सुरक्षा जवान’ या पदाकरीता 6 नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन स्तरावर रोजगार मेळावे घेऊन 111 पात्र युवकांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले तयार करण्यासाठी 6 नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन व 11 सशस्त्र दूरक्षेत्र स्तरावर वेगवेगळ्या तारखेस शिबिरे आयोजित करुन विविध प्रकारचे 3 हजार दाखले तयार करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये आज अखेर एकूण 23 हजार 767 शेतकरी पात्र झालेले आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया सुरु असून गोंदिया जिल्ह्यातील पोर्टलनुसार 23 हजार 153 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. त्यापैकी 21 हजार 40 शेतकऱ्यांना 67 कोटी रुपयांचा लाभ मिळालेला आहे.
तृणधान्याचे मानवी आहारातील महत्व व फायदे याबाबत जनमाणसात जागरुकता निर्माण करुन पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. जिल्हा पर्यटन विकास समिती व वन विभाग अंतर्गत नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समिती नवाटोला यांचे संयुक्त विद्यमाने हाजराफॉल या नैसर्गीक पर्यटन स्थळाचे विकासाचे कार्य करुन 26 युवक व 22 युवती असे एकूण 48 स्थानिक होतकरु व प्रशिक्षीत युवक-युवतींना रोजगार प्राप्त झालेला आहे. सन 2022-23 मध्ये 23 हजार 894 पर्यटकांनी भेट दिली असून त्याद्वारे 24 लाख 63 हजार रुपये महसूल प्राप्त झालेला आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार बालकांना 94 लाख रुपये अनुदान स्वरुपात लाभ देण्यात आलेला आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत आजपावेतो जिल्ह्यात 1697 लाभार्थ्यांना 4 कोटी 29 लाख 25 हजार रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौध्दिक व सामाजिक विकास व्हावा या दृष्टीने ‘मिशन शिखर’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करुन 17 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच यावर्षी देवरी प्रकल्पातून 20 विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो करीता अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला असून आश्रमशाळेतील निवडक विद्यार्थ्यांची निवड करुन प्रथमच विमानाने प्रवास करण्यात येणार आहे. कृषी पंप ऊर्जीकरण योजनेत आतापर्यंत 9 हजार 806 कृषी पंपाना वीज जोडणी देण्यात आलेली आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, विलासराव देशमुख अभय योजना यासारख्या योजनेत जिल्ह्याने लक्षणीय काम केले असून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना लाभ देण्यात येत आहे. राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा, कागदपत्रे काय जोडावीत याची माहिती नसते. यामुळे काही जण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून लवकरच हा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येणार असून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
महाराष्ट्राने 63 वर्षात नेत्रदिपक कामगिरी करुन विविध क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकाविले आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. यासोबतच जिल्हा परिषद, कृषी विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, समाजकल्याण, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर सर्व विभागामार्फत सर्वसामान्यांच्या हिताचे व लोककल्याणकारी योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास व जिल्ह्याची प्रगती हेच प्रशासनाचे ध्येय आहे. सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द होऊन जिल्हा अग्रेसर ठेवू या असे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रारंभी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. पुरुष व महिला पोलीस दल, पुरुष व महिला होमगार्ड पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, अग्नीशमन दल, आरोग्यवाहिका यांनी परेड संचलन केले. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) लिना फलके, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रोहिणी सागरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, अपर कोषागार अधिकारी लेखीचंद बाविस्कर, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक संजय धार्मिक, तहसिलदार मानसी पाटील, सहायक उपवनसंरक्षक प्रदिप पाटील, अपर तहसिलदार प्रकाश तिवारी यांचेसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांचा विकास व जिल्ह्याची प्रगती हेच प्रशासनाचे ध्येय : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
RELATED ARTICLES