छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील निवडणुका
गोंदिया : भारत निवडणूक आयोगाद्वारे छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात सार्वजनिक विधानसभा निवडणूक-2023 कार्यक्रम जाहीर झालेला आहे. छत्तीसगड राज्यात 7 व 11 नोव्हेंबर या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून मध्यप्रदेश राज्यात 17 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे व 3 डिसेंबरला छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांची मतमोजणी प्रक्रिया आहे.
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे संबंधाने छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपासून 5 कि.मी. च्या परिसरातील गोंदिया जिल्ह्यातील तालुका गोंदिया, तिरोडा, देवरी, सालेकसा व आमगाव या ठिकाणच्या देशी/विदेशी किरकोळ मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्ती मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तास अगोदर पासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद ठेवण्याची तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर 2023 रोजी बंद ठेवण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियमावली 1969 चे नियम 9 ए (2) डी व महाराष्ट्र देशी दारु नियमावली 1973 चे नियम 26 (2) (डी) अंतर्गत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करुन सदर निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील छत्तीसगड व मध्यप्रदेश सीमेपासून महाराष्ट्र राज्यातील 5 कि.मी.च्या परिसरातील सर्व किरकोळ व ठोक मद्यविक्री सर्व नमुना (सीएल-2, सीएल-3, सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएलबीआर-2, टिडी-1) हया अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
मद्यविक्री बंद कालावधी
छत्तीसगड राज्यात मतदान संपण्याच्या आधीचे 48 तास दि.5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापासून ते 7 नोव्हेंबर 2023 रोजी संपुर्ण दिवस. मध्यप्रदेश राज्यात मतदान संपण्याच्या आधीचे 48 तास दि.15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापासून ते 17 नोव्हेंबर 2023 रोजी संपुर्ण दिवस. तसेच छत्तीसगड व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यातील दि.3 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणीच्या दिवशी (मतमोजणी संपेपर्यंत).
सदर आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करुन अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी कळविले आहे.