मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित
गोंदिया : मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व मतदार यादीचे शुध्दीकरणासह लोकशाही मजबूत करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे अध्यक्ष व सचिव यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत गोंदिया जिल्हयातील विधानसभा मतदार संघातील एकुण 1282 मतदान केंद्रावर केंद्र स्तरीय प्रतिनिधीची (BLA) नियुक्ती करण्याबाबत व सदर मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार यादी ‘शुध्दीकरण करण्याच्या कामासाठी केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सहयोग देण्याची विनंती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी यावेळी केली.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत 21 जुलै 2023 (शुक्रवार) ते 21 ऑगस्ट 2023 (सोमवार) पर्यंत गोंदिया जिल्हयातील विधानसभा मतदार संघातील एकुण 1282 केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत मतदार शुध्दीकरण करण्याअंतर्गत घरोघरी भेट देणार आहेत. सदर मतदार यादीतील दुबार, कायम स्वरुपी स्थलांतरीत व मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीतील मतदारांच्या नावात, जन्म दिनांक व इतर काही दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यात येणार आहे. आधार अद्यावत न केलेल्या मतदारांकडून आधार क्रमांक गोळा करण्याचे कामही करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरीकांनी नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या संभाव्य मतदारांनी किंवा ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही अशा सर्व नागरिकांनी ओळखपत्र, आधारकार्ड, रहिवास पुरावा, नात्यातील किंवा शेजारी राहणाऱ्या मतदाराचे इपीक कार्ड इत्यादी कागदपत्रासह फॉर्म नंबर 6 भरुन आपले नांव मतदार यादीमध्ये नोंद करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीतून नांव कमी करणे
मयत झालेले मतदाराचे नातेवाईक यांनी मृतकाचे मृत्यू प्रमाणपत्रासह फॉर्म नंबर 7 भरुन मतदार यादीतून नांव कमी करुन घ्यावे. तसेच स्थलांतरीत मतदार तसेच ज्या मुलींचे विवाहानंतर स्थलांतरण झाले आहे अशा सर्व मतदारांनी नविन वास्तव्याच्या पुराव्यासह फॉर्म नंबर 7 भरुन मतदार यादीतून नांव कमी करुन घ्यावे. तसेच मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिक नोंदी असलेल्या मतदारांनी सुध्दा फॉर्म नंबर 7 भरुन मतदार यादीतून स्वत:चे एक नांव कमी करुन घ्यावे.
विद्यमान मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती करणे
मतदाराचा रहिवास पत्ता बदलेला असल्यास पूर्वीच्या पत्त्यावरील नांव वगळून सध्याच्या पत्त्यावर स्थलांतरीत करणे, विद्यमान मतदार यादीतील नांव, लिंग, जन्मतारीख/वय, नात्याचा प्रकार, नात्याचे नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक व छायाचित्र दुरुस्त करणे, कुठल्याही दुरुस्तीशिवाय मतदार ओळखपत्र बदलून घेणे तसेच दिव्यांग व्यक्ती यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्रासह अर्ज करुन दिव्यांग व्यक्ती म्हणून चिन्हांकित करणे इत्यादींसाठी मतदारांनी आवश्यक कागदपत्रासह फॉर्म नंबर 8 भरुन दुरुस्ती करुन घ्यावे.