गोंदिया : तालुक्यातील ग्रामपंचायत इर्री येथे परिचर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मागील २७ महिन्यापासून वेतन न दिल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची पाळी आल्याने ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ३१ मे रोजी दुपारी घडली. रमेश नान्हू ठकरेले (४८) रा. इर्री असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या परिचराचे नाव आहे. त्याला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.मागील २७ महिन्यापासून परिचराला वेतन देण्यात आले नाही.ग्रामसेवक नरेश बघेले यांच्या उदासिन धोरणामुळे इर्री ग्राम पंचायत डबघाईस गेली आहे.ग्रामसेवकाने मागील २७ महिन्यापासून परिचाराला वेतन न दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.तुटपुंजे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येते. परंतु तुटपुंजे मानधन ही मिळत नसल्यामुळे त्यांनी कसे जगायचे काय असा सवाल ग्राम पंचायत युनियनचे राज्य कार्याध्यक्ष मिलींद गणवीर यांनी केला आहे. परिचर रमेश नान्हू ठकरेले (४८) रा. इर्री हे आपल्या वेतना संदर्भात जेव्हा -जेव्हा ग्रामसेवकाला बोलत होते तेव्हा तुला जे बनते ते कर, वेतन देत नाही,कामावरून बंद करू अशी धमकी द्यायचा. त्यामुळे तणावात आलेल्या रमेश ठकरेलेने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.त्याची प्रकृती नाजूक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र राज्य पंचायत कर्मचारी महा संघाचे राज्य कार्याध्यक्ष मिलींद गणवीर यांनी दिला आहे.
२७ महिन्यापासून पगार न झाल्याने परिचराचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
RELATED ARTICLES