गोंदिया : सरन्यायाधिश भुषण गवई यांच्यावर एका वकिलाने बुट भिरकाविला. ही घटना देशाच्या न्यायप्रणालीवर आघात करणारी आहे. या घटनेने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अशाप्रकारे कृत्य लोकशाहीला काळीमा फासणारे आहे. दरम्यान जिल्हाभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला जात आहे. त्यानुरूप (ता. १३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ भारतच्या वतीने न्या. गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. घटनेतील त्या वकिलाला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वकिल राकेश किशोर यांनी सरन्यायाधिश भुषण गवई यांच्या दिशेने बुट भिरकावला. ही घटना अत्यंत निंदनीय, अशोभनीय आणि लोकशाही मूल्यांवर हल्ला करणारा आहे. न्यायासन हे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर राष्ट्राच्या राष्ट्राच्या न्यायबुद्धीचे आणि संविधानिक प्रतिष्ठेचे प्रतीक असते. या घटनेतून तथाकथित ‘सनातनी’ घटकांतील असहिष्णु प्रवृत्ती उघड झाली आहे. असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघ भारतच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी सदर गुन्हेगाराविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. तर उलट सरन्यायाधीशांचा अपमान करण्यासाठी भडक विधान करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर काही संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सरन्यायाधीशांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्व प्रकार भारतीय न्याय व्यवस्थची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणून सुरू आहेत. यामुळे न्या. गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून त्या समाजकंटकावर कठोर शिक्षा करावी, या मागणी अधिवक्ता संघाने केली आहे. जिल्हाधिकारी परिसरात निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला. तसेच मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
यावेळी अॅड. आर. डी. बनसोडे, अॅड. एस. के. गडपायले, अॅड. एस. एम. चौरे, अॅड. ए. डी. बोरकर, अॅड. प्रज्ञा डोंगरे, अॅड. मंगला बन्सोड, अॅड. मिना भोवते, अॅड. एस. व्ही. सुखदेवे, अॅड. सी. जे. गजभिये, अॅड. एम. बी. रामटेके, अॅड. डी. जे. वंजारी, अॅड. एस. एस. कोल्हे, एस. एस. मानकर, अॅड. एम. ए. मेश्राम, अॅड. आर. एच. लांजेवार, अॅड. डी. टी. रामटेके, अॅड. प्रफुल्ल उके, अॅड. सी. एम. लिचडे, अॅड. आर. वाय. ठाकूर, अॅड. पी. एन. साखरे, अॅड. सचिन बोरकर, अॅड. विना धुर्वे आदिसह अधिवक्ता संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अधिवक्ता संघटनेतर्फे त्या घटनेचा तीव्र निषेध
RELATED ARTICLES






