गोंदिया : गोंदिया येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सदाशिव केसकर (वय ५३) व रामनगर निवासी खासगी इसम राजेश रामनिवास माहेश्वरी (५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७० हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
खाजगी इसम राजेश माहेश्वरी यांनी तक्रारदाराने पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेले जेसीबी वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गोंदिया येथे नोंदणी करिता आणले असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया करिता मिळून टॅक्स व्यतिरिक्त 70 हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांने 18.11.2025 रोजी ला.प्र.वि. नागपुर येथे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने 19.11.2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता खाजगी इसम राजेश माहेश्वरी यांनी तक्रारदारास पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेले जेसीबी वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे नोंदणी करणे करिता टॅक्स व्यतिरिक्त 70000 रुपये लाच रक्कम मागणी करून स्वतः स्विकारण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर 25.11.2025 रोजी पंचांसमक्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया यांची पडताळणी केली असता त्यांनी खाजगी इसमाने केलेल्या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाल्याने आज 04.12.2025 रोजी सापळा रचून खाजगी इसम राजेश माहेश्वरी यांनी तक्रारदार यांचेकडून 70000/- रू. लाच रक्कम तक्रारदाराकडून काम करून देण्याचे मोबदल्यात स्वतः स्विकारली. त्यानंतर आरोपीची अंगझडती घेण्यात आली असता खासगी इसमच्या ताब्यातून 70000/- रुपये लाचेची रक्कम व 19050 रुपये इतर रक्कम, २ मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच त्याच्या घराची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारणा 2018) कलम 7 अ, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई नागपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिटटावार यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक जितेंद्र वैरागडे, तपास अधिकारी उमाकांत उगले यांच्या पथकाने केली.






