महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन कार्यशाळा 2026
गोंदिया : जिल्ह्यातील तांदूळ व्यतिरिक्त इतर वनोत्पादने, मत्स्य उत्पादने यामध्ये मोठी निर्यात क्षमता असून उद्योजकांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करून रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी निर्यातीवर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने “महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन 2026” एकदिवसीय निर्यात कार्यशाळा आज (ता.9) जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे घेण्यात आली, यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विक्की खिराळे, नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक शिवकुमार मुद्दमवार, डीजीएफटीचे कार्यकारी अधिकारी श्री. सोनवाणे, मैत्री कक्षाच्या प्रियदर्शिनी सोनार, पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक श्री. हिवराळे, IDBI Capital सहाय्यक व्यवस्थापक उमेश रानोलिया, NIACL चे अधिकारी पियुष धोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अण्णा ठाकरे, महा STRIDE उपक्रमाचे नागपूर विभागीय समन्वयक रंजन पंधरे, तसेच जिल्हयातील इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी व विविध शासकीय विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण उत्पादनाची मागणीनुसार निर्यात वाढल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळून तसेच जिल्ह्याच्या स्थूल जीडीपीमध्ये वाढ होऊन जिल्ह्याचा आर्थिक व सामाजिक विकास साधता येईल. जिल्हा प्रशासन उद्योजकांच्या समस्या सोडवून त्यांच्या विकासासाठी सदैव तत्पर असून उद्योजकांनी त्यांच्या अडीअडचणींबद्दल जिल्हा प्रशासनाशी नियमीत संवाद साधावा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक शिवकुमार मुद्दमवार यांनी केले. ‘महा निर्यात’ उपक्रमामागील शासनाची भूमिका स्पष्ट करत, जिल्हास्तरावर निर्यातक्षम उद्योग उभारण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन निर्यात क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महाव्यवस्थापक विक्की खिराळे यांनी महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 तसेच ODOP व GI उत्पादनांना शासनाच्या धोरणाबाबत मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार सन 2024-25 मध्ये गोंदिया जिल्हयातील निर्यात 2161 कोटी इतकी असून नागपूर विभागातून गोंदिया जिल्हयाचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यातून प्रामुख्याने तांदुळ व लाख यांची निर्यात केली जाते.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, औद्योगिक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) निर्यात प्रक्रियेबाबत सखोल व व्यावहारिक मार्गदर्शन देऊन स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचवणे हा होता. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यशाळेमध्ये निर्यात प्रक्रिया व नोंदणी, परदेशी बाजारपेठेत प्रवेशाच्या संधी, निर्यात प्रोत्साहन योजना व शासकीय अनुदाने, कृषी व प्रक्रिया उद्योगांसाठी वित्तपुरवठा योजना, एफपीओ एमएसएमईसाठी निर्यात धोरणे तसेच जिल्हा निर्यात हब संकल्पना या विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. समारोप प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सारंग पटले यांनी उपस्थितांचे आभार मानत, जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
उद्योजकांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करुन निर्यातीवर भर द्यावा : जिल्हाधिकारी प्रजित नायर
RELATED ARTICLES






