गोंदिया : दुरुस्तीसाठी आणलेल्या १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मुंडीपार-तेढा मार्गावर घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला असून रुग्णवाहिकेचे तुकडे होत सुमारे ४०० मीटर अंतरावर फेकले गेले. त्यातच शेजारील घर व दुकानांच्या खिडक्यांच्या काचा फुटून एका दुकानालाही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटात रुग्णवाहिकेचा उडालेला एक टिनाचा पत्रा लागल्याने एकजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, सदर रुग्णवाहिका देवरी तालुक्यातील चिचगड येथील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत येत असून तिच्यात काही दिवसांपूर्वी बिघाड झाल्याने ही रुग्णवाहिकेला आज, गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया येथून टो-वाहनाने मुंडीपार येथील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये दुरूस्तीसाठी आणली होती. दरम्यान, रुग्णवाहिका चालक वाहन उभे करून चहा पिण्यासाठी गेला असता अचानक इंजिनमधून धूर निघू लागला व काही कळण्याच्या आत रुग्णवाहिका जळून भस्मसात झाली. यावेळी रुग्णवाहिकेत ठेवलेल्या ऑक्सिजन सिलींडरला आगीची झळ बसल्याने सिलींडरचा भयंकर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिकांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तसेच एका दुकानालाही आग लागली. त्यातच वाहनाचे टिनाचे पत्रे सुमारे ३०० ते ४०० मीटरपर्यंत उडाले. सुदैवाने यावेळी जवळपास कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, एका युवकाला उडून आलेला टिनाचा पत्रा लागल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती गोरेगाव पोलिस व अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र, तोपर्यंत रुग्णवाहिका होत्याची नव्हती झाली होती. इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.
ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, 108 रुग्णवाहिका जळून खाक
RELATED ARTICLES






