गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा उल्लेख करून काँग्रेसकडून प्रसारित करण्यात आलेल्या एआय व्हिडिओविरोधात आज 12 सप्टेंबर रोजी गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सारस चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व आमदार चित्रा वाघ यांनी केले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजप जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, भेरसिंग नागपुरे, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, विजय शिवणकर, पंकज रहांगडाले आदी मान्यवरांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार वाघ सह सर्व आमदार, पदाधिकारी यांनी काँग्रेसच्या या कृतीचा तीव्र निषेध केला. राजकारणाच्या नावाखाली मातृत्वाचा अपमान करणे ही संतापजनक बाब असून, जनतेला दिशाभूल करण्याचा हा घातक प्रयत्न आहे, असे भाजप आ. वाघ यांनी सांगितले. तसेच काँग्रेसविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून काँग्रेसच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
भाजपच्या या आंदोलनामुळे गोंदियात राजकीय वातावरण तापले होते.
काँग्रेसच्या एआय व्हिडिओविरोधात गोंदियात भाजपचे तीव्र आंदोलन
RELATED ARTICLES