Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedकाँग्रेसच्या बैठकीत गोंधळ आमदार, खासदारांच्या समर्थकांमध्ये खडाजंगी

काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ आमदार, खासदारांच्या समर्थकांमध्ये खडाजंगी

गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १४) येथील विश्रामगृहात आयोजित देवरी-आमगाव मतदारसंघातील काँग्रेसच्या बैठकीत मोठा वाद उफाळून आला. आमदार सहसराम कोरोटे आणि खासदार नामदेव किरसान यांच्या समर्थकांमध्ये उमेदवारीवरून खडाजंगी झाली. या वादामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा उघडकीस आला. विधानसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्याच्या तयारीला गती दिली आहे. काँग्रेस पक्षानेही या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नेमणूक केली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातही याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते वेलया नाईक यांनी निरीक्षक म्हणून १४ ऑक्टोबर रोजी बैठक घेतली.
विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान आणि देवरीचे आमदार सहसराम कोरोटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती. मात्र, उमेदवारीवरून चर्चा सुरू होताच दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला. बाचाबाची वाढत गेल्याने गटांच्या समर्थकांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या आणि काही जणांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे बैठक गोंधळात संपली. या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि नेत्यांमधील तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आगामी निवडणुकीत हा वाद उमेदवाराच्या विजयावर कसा परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments