गोंदिया : गोंदिया आणि बालाघाट या दोन्ही जिल्ह्यांच्या जीवनदायिनी माँ वैनगंगा आणि बाघ नदीच्या पवित्र संगमावर रजेगाव घाट येथे दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट, कोरनीच्या संयुक्त विद्यमानाने कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर माँ गंगा महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.५) महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. महाआरतीला जनसागर उसळल्याचे चित्र होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला माँ गंगा महाआरती अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने पार पडली. माँ गंगेच्या महाआरतीत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल प्रामुख्याने सहभागी झाले होते. याप्रसंगी राजेंद्र जैन यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा अर्चना केली. तसेच महाआरतीत उपस्थित राहून माँ गंगेची महाआरती केली. सर्वांच्या जीवनात सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
राजेंद्र जैन म्हणाले हा दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम आपल्या परिसराची श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे. स्व. शिवशंकर तुरकर आणि हरिहरभाई पटेल यांनी या महोत्सवाची परंपरा सुरु केली गेली. हे पवित्र स्थान आपल्या जीवनस्रोत माँ वैनगंगेप्रमाणे जीवनाला अमृत लाभ देणारे आहे. आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण या वारसाची पवित्रता आणि सांस्कृतिक ओळख जपली पाहिजे असे सांगितले. यावेळी देवेंद्रनाथ चौबे, सुरेश हर्षे, गोवर्धन पटले, केतन तुरकर, डी. यू, रहांगडले, रामलाल उईके, नीरज उपवंशी, करण टेकाम, सुनील पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकूर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.






