गोंदिया. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामवासी बंधु-भगिनींच्या भरीव सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात, जल्लोषपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

दि. २५ ते २९ डिसेंबर दरम्यान जि.प. हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विशाल पटांगणावर पार पडलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील खेळाडू व कलाकारांनी क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. खेळाडूंनी दाखवलेली मेहनत, कौशल्य, संघभावना आणि उत्कृष्ट खेळाडूवृत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. महोत्सवाच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभात विजयी संघ व वैयक्तिक स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले की, “खेळामुळे केवळ शारीरिक सुदृढता वाढत नाही, तर शिस्त, संयम, नेतृत्वगुण आणि संघभावना निर्माण होते. ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देणे हेच अटल क्रीडा महोत्सवाचे खरे उद्दिष्ट आहे. अशा स्पर्धांमधून उद्याचे गुणवंत खेळाडू घडतील.”तसेच स्पर्धेत सहभागी होऊनही यश न मिळालेल्या संघांना खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पुढील स्पर्धांमध्ये निश्चितच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत “हार ही अपयश नसून यशाच्या दिशेने नेणारी पायरी आहे” असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.
खेळातून शिस्त, संस्कार व नेतृत्वगुण विकसित होतात : जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर
RELATED ARTICLES






