गोंदिया : गोंदिया जिल्हयाचा सर्वसमावेशक विकास साधूया यात कुणीही मागे राहणार नाही याची दक्षता घेऊया, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभाच्या प्रसंगी केले. कारंजा रोडवरील पोलीस मुख्यालय येथे 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला, त्यावेळी श्री. नाईक बोलत होते.

श्री. नाईक यांनी यावेळी जिल्ह्यातील समाजातील सर्वस्तरातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. नाईक यांनी त्यांच्या मुख्य भाषणात आपला जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो असे सांगत, वर्ष 2024-25 मध्ये आपल्या जिल्ह्यात धानाचे विक्रमी उत्पादन झालेले होते अशी माहिती दिली. यावर्षी 2025-26 मध्ये प्रत्यक्षात 188 धान खरेदी केंद्रामार्फत 1 लाख 28 हजार 606 शेतकऱ्यांनी बीम या शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. तसेच 31 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत 51 हजार 959 शेतकऱ्यांकडून 17 कोटी 68 लाख 333.22 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याची रक्कम शासनाकडून प्राप्त होताच अदा करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू असून या योजनेचा 21 व्या हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील 2 लाख 12 हजार 773 शेतकरी लाभार्थ्यांना थेट खात्यात पोहोचलेला आहे. याच योजनेच्या धर्तीवरच राज्याकडूनही नमो शेतकरी आत्म महासन्माननिधी दिला जातो. या योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभाचे वितरण 9 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले असल्याचे सांगितले.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यामध्ये एकूण 124 प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 75 लाभार्थी शेतकऱ्यांना 150 लाख रुपयांचे अनुदानाची मदत करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 683 अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. येत्या काळात कार्यान्वित उद्योग आपल्याला प्रत्यक्ष दिसतील, असे सांगितले.
गोंदिया जिल्हा वन समृद्ध आहे. तेंदू पानांचे संकलन मोठ्या प्रमाणात केले जात असून यानिमित्ताने रोजगार प्राप्त होतो. यासह निसर्गाच्या संपन्नतेमुळे निसर्ग पर्यटन स्थळाला पर्यटकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. यानिमित्ताने स्थानिक होतकरू प्रशिक्षित युवक युवतींना रोजगारही उपलब्ध होत आहे याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. वन्यजीव व मानव संघर्ष अधून मधून होतो शासनाकडून कारवाईनंतर आर्थिक मदतीचा हात दिला जातो, वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठीही योग्य ते पावले उचलली जातील, यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही एक महत्त्वाची योजना असून या अंतर्गत 100 दिवसांचे रोजगार उपलब्ध करून दिले जातात. वर्ष 2025- 26 या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी 78.70 लक्ष मनुष्य दिवस उद्दिष्ट साध्य केलेले आहे. रोजगार हमीची कामे योग्य होत असल्याचे कौतुक केले.
केंद्र सरकार तसेच राज्य सरकार क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत जिल्ह्याने डिसेंबर अखेरपर्यंत 2 लाख 53 हजार 661 संशयित रुग्णांच्या थुंकीची तपासणी केलेली आहे. यापैकी संशयित रुग्णांवर इलाज करून त्यांना क्षयरोगमुक्त केलेले आहे. यासह जिल्ह्यातील 7 लाख 12 हजार 03 नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागही जिल्ह्यात आपले काम चोख बजावत असून जिल्ह्यातील रुग्णांना रक्त कमी पडू नये यासाठी केटीएस हॉस्पिटलच्या रक्तपेढीस रक्त घटक पाठाची मंजुरी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना औषधेची ही कमतरता भासू नये याकरिता नवीन 74 औषधे विक्री परवाने मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाने डिसेंबर 2025 पर्यंत 7 बालविवाह रोखले असून दोन प्रकरणात गुन्हे दाखल झालेला आहे. या विभागाकडून अनाथांना प्रमाणपत्र दिले जातात 2025 अखेरपर्यंत 181 मुलांना संस्थाबाह्य अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले असून यापैकी आठ मुलांना शासकीय नोकरी मिळालेली आहे. ही आनंदाची बाब आहे. तर सहा मुलांना शैक्षणिक क्षेत्रात याचा लाभ मिळत आहे. मी इथून सांगू इच्छितो आपल्या जिल्ह्यात संकटात सापडलेल्या बालकांना मदत करण्यासाठी 1098 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून मदत मागता येते. सुजाण नागरिक म्हणून आपण ते करावे असे आवाहन त्यांनी केले, आज या ठिकाणी बालविवाह मुक्त गोंदिया करण्याची शपथ ही देण्यात आली.
जिल्ह्यातील कामगार विभाग चांगले काम करीत असून कामगारांसाठी असलेल्या विविध योजनेअंतर्गत 5 हजार 699 कामगारांना आतापर्यंत 6 कोटी 78 लाख 400 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. कामगाराच्या हिताचे शासन करत आहे असे सांगत नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत 23 हजार 379 लाभार्थी कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटपही केलेले आहे. कामगारांची आरोग्य तपासणी विभाग करीत असून आतापर्यंत जिल्ह्यातील 24 हजार 118 बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांची आरोग्य तपासणी केलेली आहे. बालकामगार मुक्त गोंदिया करण्यासाठी ही विभाग कार्यरत आहे, आपण ही आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे, आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विभागाकडून युवक युवतींसाठी अनेक कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम राबविली जात आहेत. या माध्यमातून स्वयंरोजगारांच्या संधी तरुणांना उपलब्ध आहेत. याचा अधिकाधिक उपयोग तरुणांनी करून नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे तयार व्हावेत, असे सांगितले.
गोंदियातील पाटबंधारे प्रकल्पातील मध्यम प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील वर्ष 25 – 26 मध्ये लाभक्षेत्राच्या पावसाच्या पाण्यामुळे 1 हजार 264 हेक्टर सिंचन झाले असून खरीप हंगामाच्या सिंचनाकरिता 363 हेक्टरला प्रत्यक्ष पाणी देण्यात आलेले आहे. तसेच उन्हाळी पिकांकरिता 1 हजार 435 हेक्टरला पाणी देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई होणार नाही असा प्रयत्न केला जाईल, असे श्री. नाईक यावेळी म्हणाले.
आपला जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून देवरी तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासीबहुल भागांसाठी विशेष योजना राबविल्या जातात. शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वस्तीगृहात 7 हजार 288 मुले तर 7 हजार 245 मुली आहेत. मुलींची संख्या मुलांच्या जवळपास बरोबरीची असणे हे जिल्ह्यासाठीही प्रगतीची लक्षण आहे. वर्ष 25 – 26 मध्ये मिशन ऍथलेटिकच्या अंतर्गत तब्बल 31 विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांची क्रिडा क्षेत्रातील प्रगती नेत्रदिपक असल्याचे समाधान व्यक्त केले.
जिल्हा पोलीस दल अत्यंत उत्कृष्ट काम करीत असून पोलिसांच्या प्रभावी उपायोजनेमुळे 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील अतदुर्गम नक्षलग्रस्त परिसरात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याच्या उद्देशाने “पोलीस दादालोरा खिडकी” हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. पोलीस अधीक्षक व पोलीस दलाचे कौतुक करतो. या योजनेअंतर्गत नक्षल प्रभावित भागांमध्ये नागरिकांच्या विकासाचा विचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न प्रशंसनीय असा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात यावे, मागे कोणीही राहू नये यासाठी शासन प्रयत्नरत असून नागरिकांनी ही साथ तेवढीच महत्त्वाची, असल्याचे सांगितले.
येत्या 30 तारखेपासून आदिवासींचे दैवत असलेल्या कचारगडची महत्त्वाची यात्रा आपल्या जिल्ह्यात सुरू होत असून यासाठी सर्व आदिवासी बांधवांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ही यात्रा चांगली व्हावी, पारी कोपार लिंगो चा आशीर्वाद आपल्या जिल्ह्यावर सदैव राहावा. तसेच इतर राज्यातील आदिवासी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांना अडचण होणार नाही याची दक्षता शासन प्रशासनासह जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी घ्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी मंचावरून केली.
आपले राज्य विकासाच्या दृष्टीने देशात अव्वल व गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम राहील यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.






