जिल्ह्यातील चारही प्रभागात उत्स्फुर्तपणे मतदान
गोंदिया, : न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया नगरपरिषदेच्या जागेकरीता प्रभाग क्रमांक 3 (ब), 11 (ब) व 16 (अ) आणि तिरोडा नगरपरिषदेच्या जागेकरीता प्रभाग क्रमांक 10 (अ) मध्ये आज शांततापुर्वक मतदान पार पडले.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगरपरिषदेतील उर्वरित एकूण चार प्रभागामध्ये आज मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती.

गोंदिया जिल्ह्यात एकूण 63.29 % मतदान झाले असून गोंदिया नगरपरिषदेमध्ये 62.36% व तिरोडा नगरपरिषदेत 69.64% मतदान झाले. या मतदान प्रक्रियेमध्ये स्त्री, पुरुष, तरुण, वृध्द व नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान करण्यासाठी आपला उत्साह दर्शविला. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी काही मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
गोंदिया नगरपरिषदेतील *प्रभाग क्र.3* मध्ये जेठाभाई माणिकलाल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया येथील खोली क्र.1, 2, व 3 या मतदान केंद्रावर तसेच श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालय गोंदिया येथील खोली क्र.4 व 5 मध्ये मतदान झाले. त्याचप्रमाणे *प्रभाग क्र.11* मध्ये मनोहर न.प.हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया येथील खोली क्र.1 व 2 या मतदान केंद्रावर तसेच मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी स्कुल गोंदिया खोली क्र.3, 4, 5 व 6 मध्ये मतदान झाले. तसेच *प्रभाग क्र.16* मध्ये नगर परिषद मनोहर म्युनिसिपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गोविंदपूर येथे खोली क्र.1, 2, 3, 4 व 5 मध्ये मतदान झाले.
तिरोडा नगरपरिषदेतील *प्रभाग क्र.10* मध्ये राणी अवंतीबाई शाळा तिरोडा येथील पश्चिमेकडून खोली क्र.3, राणी अवंतीबाई शाळा तिरोडा येथील पूर्वेपासून खोली क्र.1 (अंगणवाडी) व जि.प.शाळा जूनी वस्ती तिरोडा येथील पश्चिमेकडून खोली क्र.2 मध्ये मतदान झाले.
गोंदिया नगर परिषदेतील उर्वरित तीन वार्डामध्ये पुरुष- 7652, महिला- 8131 व इतर- निरंक असे 15 हजार 783 मतदार असून तिरोडा नगर परिषदेतील एका वार्डामध्ये पुरुष- 1097, महिला- 1209 व इतर-निरंक असे 2 हजार 306 मतदार आहेत. जिल्ह्यातील उर्वरित चारही प्रभागातील असे एकूण 18 हजार 89 मतदार आहेत. सर्व एकत्रित मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीचे निवडणूक प्रभाग गोंदिया- 22, तिरोडा- 10, सालेकसा- 17 व गोरेगाव- 17, असे जिल्ह्यात एकूण 66 प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांची एकत्रित मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजतापासून सुरु होणार आहे.






