चाचा नेहरू बाल महोत्सव बक्षिस वितरण समारोह
गोंदिया : शासकीय निरीक्षण गृहातील अनाथ, निराधार, निराश्रीत व बाह्य शाळेतील बालकांमध्ये एकमेकांशी आदर, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी चाचा नेहरु बाल महोत्सवातून अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य निर्माण होते, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक (गृह) रामदास शेवते यांनी केले. महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जेठाबाई माणिकलाल हायस्कुल, गणेशनगर, गोंदिया येथे आज (ता.12) जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या बक्षिस वितरण समारोह कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोले, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष देवका खोब्रागडे, जेठाभाई माणिकलाल हायस्कुलचे प्राचार्य संजय अग्रवाल उपस्थित होते.
रामदास शेवते म्हणाले, अनाथ, निराधार व निराश्रीत मुलांना आश्रय देवून त्यांचे पालन-पोषण करण्याचे काम महिला व बाल विकास विभाग करीत आहे. बालकांचे संरक्षण करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस आहे. विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान आहेत. मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी चाचा चेहरु बाल महोत्सव हे एक व्यासपीठ आहे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा मोरे यांनी केले. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत दिनांक 10 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन जेठाबाई माणिकलाल हायस्कुल, गणेशनगर, गोंदिया येथे करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या महोत्सवात विविध शाळांमधील जवळपास 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बाल न्याय समितीच्या अध्यक्ष देवका खोब्रागडे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोले, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आज समारोह कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रजनी रामटेके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी मानले.






