जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय १० शाळा अंगणवाडी मॉडेल करा : जि.प.अध्यक्ष रहांगडाले

0
265

सडक अर्जुनी पंचायत समिती सभागृहात घेतला विविध विषयांचा आढावा

गोंदिया : राज्य शासनाच्या वतीने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना ‘ राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करून एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. तालुक्यातील ५ जिल्हा परिषद क्षेत्रातील १० पंचायत समिती गणातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी किमान १० शाळा व अंगणवाडीना भेटी देवून मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावे व किमान १० शाळा व अंगणवाडी मॉडेल करावे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना केले.

५ जुलै रोजी सडक अर्जुनी येथे पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजी.यशवंत गणवीर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेस्वर पटले, जिल्हा परिषद सदस्य कविता ताई रंगारी, निशा तोडसाम, ललिता डोंगरवार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते, पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये, डॉ. वाढई, आदी उपस्थित होते.यावेळी पंचायत समिती स्तरावरील सर्वच विभागाचा आढावा घेण्यात आला.

शासनाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र त्यांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळत नसल्याने ते लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आता सर्वांना लाभ कसा दिला जाईल याचे नियोजन करून शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुणीही पैशाची मागणी केली किंवा अडवणूक केली तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण संजय गणवीर, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग सत्यजित राऊत, सहायक गटविकास अधिकारी खोटेले यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी सानप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी (आरोग्य) शेंडे यांनी तर आभाप्रदर्शन अधीक्षक जयंत खोटेले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here