गोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ३० जून रोजी पार पडली. एकूण २० संचालक पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यानंतर आता १९ जुलैला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे यासाठी आता मोर्चेबांधणीला वेग आहे.जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सहकार पॅनलच्या संचालकाची वर्णी लागणार आहे. अध्यक्ष पदासाठी माजी आ. राजेंद्र जैन यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेच्या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा तसे संकेत दिले होते हे विशेष.
तब्बल १३ वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हा बँकेची निवडणूक ३० जून रोजी पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र येत सहकार पॅनल तयार करून निवडणूक लढविली. तर काँग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येत परिवर्तन पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली होती. एकूण २० संचालक पदांसाठी ही निवडणूक पार पडली. यात सहकार पॅनलचे ११ तर परिवर्तन पॅनलचे ९ संचालक निवडून आले. त्यामुळे जिल्हा बँकेवर सहकार पॅनलने वर्चस्व स्थापन केले. मात्र निवडणुकीनंतर दोन दिवसांनी परिवर्तन पॅनलच्या दोन संचालकांनी सहकार पॅनलला समर्थन जाहीर केले. त्यामुळे जिल्हा बँकेत सहकार पॅनलची ताकद अधिक वाढली आहे.संचालकपदाची निवडणूक पडल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक केव्हा जाहीर होते याकडे लागल्या होत्या. यानंतर आता सहकार निबंधक कार्यालयाने जिल्हा बँक अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला असून १९ जुलै रोजी दुपारी १ ते ४:३० वाजता दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
विरोधकांकडून मोर्चेबांधणी
जिल्हा बँक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे ९ संचालक निवडून आले. मात्र यापैकी दोन संचालकांनी सहकार पॅनलला आपले समर्थन जाहीर केले. त्यामुळे परिवर्तन पॅनलच्या संचालकांची संख्या ७ वर आली आहे. पण यानंतरही त्यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे चित्र आहे.






