वर्ष 2025-26 साठी 407 कोटी रुपये प्रस्तावित
नविन जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजनाची बैठक संपन्न
गोंदिया : जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी विविध विभागाच्या अंमलबजावणी यंत्रणांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी वितरीत करण्यात येतो. जिल्हा विकासाचा निधी निर्धारित वेळेत खर्च करुन गुणवत्तापूर्ण कामे करा, असे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नविन जिल्हा नियोजन भवनात आज संपन्न झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत दिले. वर्ष 2025-26 साठी 407 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन गोंदिया येथे आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ.प्रशांत पडोळे, खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, डॉ.अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजकुमार बडोले, संजय पुराम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वर्ष 2025-26 साठी 407 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. यामध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी 298 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेसाठी 50.1398 कोटी, आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेसाठी 12.6664, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 46 कोटी रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आलेला आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी 265 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी (TSP) 48.8437, आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेसाठी 9.0669 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 46 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित होता. प्रस्तावित निधीची 100 % कामे पूर्ण केलेली आहेत.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वितरीत करण्यात आलेला जिल्ह्याच्या विकास कामांचा निधी शंभर टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. जनतेची कामे वेळेत होतील अशी भावना ठेवावी. जलजीवन मिशन अंतर्गत शेवटच्या घटकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे. सामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे अशा पध्दतीने कामे करावी. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून यंत्रणांनी कामे करावीत. अंमलबजावणी यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून मंजूर झालेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाचा निधी सर्वसामान्यांच्या कामात येईल याकडे यंत्रणांनी लक्ष द्यावे अशा आग्रही सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळातील नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शेती व रोजगार निर्मिती या विषयांवर विशेष भर देवून कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले. गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे नेण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करण्याची गरज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.