गोंदिया : राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-2025 चा निकाल जाहीर झाला असून आज (ता.31) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे समन्वयक प्रजित नायर यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष भैय्यासाहेब बेहेरे व जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव मुरलीनाथ वाडेकर उपस्थित होते.
जिल्हा स्तरावर श्री नवयुवक किसान मंडळ देवरी या मंडळाला प्रथम पुरस्कार मिळाला, तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अर्जुनी मोरगाव या मंडळाला द्वितीय पुरस्कार व बाल गणेश मंडळ पाटेकुर्रा ता.सडक अर्जुनी या मंडळाला तृतीय पुरस्कार मिळाला. तसेच तालुका स्तरावर श्री अपना गणेश उत्सव मंडळ गोंदिया व राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार ता.गोरेगाव यांना प्रथम पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार आज (ता.31) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे समन्वयक प्रजित नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री नवयुवक किसान मंडळ देवरी या मंडळाला जिल्हास्तरावर प्रथम पुरस्काराचे पारितोषिक प्राप्त झाले असून पारितोषिक स्वरुपात 50 हजार रुपये व प्रमाणपत्र शासनामार्फत मुंबई येथे सांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्काराच्या स्वरुपात राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार 7 लक्ष 50 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार 5 लक्ष रुपये व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार 2 लक्ष 50 हजार रुपये व प्रमाणपत्र. जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार 40 हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार 30 हजार रुपये व प्रमाणपत्र. तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये व प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मार्फत आयोजित करण्यात आली होती. ज्यात गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपुरक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या आधारावर सहभाग घेतला होता. विजेत्या मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमास सहायक जिल्हा नियोजन अधिकारी रुपेशकुमार राऊत, सहायक संशोधन अधिकारी तुलसीदास झंझाड व गणेश बिणेकर, सांख्यिकी सहायक मंगेश लिमजे व उत्तम साकोरे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राज्य शासनाच्या पुरस्कारांचे वितरण
RELATED ARTICLES






