गोंदिया : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून ते सौँम्य प्रकाराचे असल्याने जिल्हा वासियांना न घाबरण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.सद्य स्थितीत दोन्ही रुग्ण घराताच क्वारंटाईन असुन औषधोपचार घेत आहे.पंरतु गोंदियावासियांनी गाफील न राहता कोविड सदृष लक्षणे दिसताच जवळील आरोग्य संस्थेत जावुन उपचार करुन घ्यावे तसेच कोविड वर्तणुक बदलाचे नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्याठिकाणी त्यांच्या संपर्कात असणार्यांना शोधून गंभीर लक्षणे नसणार्यांना घरातच ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी सांगितले आहे. राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या बघता सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दि.2 जुन रोजी पाठविलेल्या कोविड-19 मार्गदर्शक सुचना देवुन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.तसेच प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्याबाबत सुचित केले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत तुरकर व सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी माहीती दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सहव्याधी रुग्ण जसे मूत्रपिंड विकार, मेंदूविकार, मधुमेह, ह्रदयरोगी, कर्करोगी, फुफ्फुसाचे, विशेषत्वाने वृद्ध सहव्याधी असलेले लोक आणि रोग प्रतिकारक शक्तीची कमतरता असलेले या गटातील लोकांनी कमी हवेशीर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा अशा ठिकाणी फेस मास्कचा वापर करावा.लोकांनी काळजी घेणे, नागरिकांनी नियम पाळावे व कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तपासणी करणे हाच संसर्ग रोखण्याचा उपाय असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत तुरकर यांनी सांगितले आहे.
तीव्र श्वसन आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याचे स्वयंनिरीक्षण ठेवावे आणि जर धाप लागणे छातीत दुखणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत जाण्याचे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.अग्रवाल यांनी म्हटले आहे. हाताची स्वच्छता,श्वसन स्वच्छता,खोकण्याची शिष्टाचार खोकताना शिकताना तोंड किंवा नाक झाकणे सार्वजनिक ठिकाणी न थूंकणे इत्यादी यासारख्या स्वच्छता पूर्ण वर्तनाचे समुदायाने पालन करण्याची गरज असल्याचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी माहीती दिली आहे.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्दी,खोकला व ताप सदृष लक्षणे असल्यास गर्दीत न जाणे किंवा फेस मास्कचा वापर,सुरक्षित दोन फुटाचे सामाजिक अंतर,नियमित हात वारंवार स्वच्छ धुणे,सार्वजनिक ठिकाणी इतरत्र कुठेही न थुंकणे,शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर करणे हे कोविड वर्तणूक बदलाचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे व नियम पाळणे हे स्वयंफुरतीने केले तरच संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. जिल्ह्यात बाहेरून येणारे परदेशातील, परराज्यातील लोकांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी वा इतर कोणतीही लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून उपचार करण्याबाबत आवाहन डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे.
कोविड वर्तणुक बदलाचे नियम पाळण्याची पुन्हा गरज
हाताची स्वच्छता,श्वसन स्वच्छता,खोकण्याची शिष्टाचार ,खोकताना शिकताना तोंड किंवा नाक झाकणे ,सार्वजनिक ठिकाणी न थूंकणे इत्यादी यासारख्या स्वच्छता पूर्ण वर्तनाचे समुदायाने पालन करण्याची गरज.
– डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी