गोंदिया : गोंदिया नगर परिषदेकरिता मंगळवारी (दि.२) मतदान घेण्यात आले. सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी छोटा गोंदिया परिसरातील टेक्नीकल विद्यालयात सेंटर असलेल्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन बंद पडली. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान दहा ते पंधरा मिनिटे थांबले होते. त्यानंतर पर्यायी उपलब्ध ठेवलेली ईव्हीएम मशिन लावून मतदानाची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. तर प्रभाग क्रमांक २२ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रातील रूम नंबर ४ ची मशीन दुपारी १२.५२ वाजता पासून बंद झाली होती. मतदारानी मतदान देताना मशीनचे बटण काम करीत नव्हते. तांत्रिक दुरुस्तीनंतर १:३२ वाजतापासून परत मशीन सुरू झाली व मतदानाला सुरुवात झाली आहे. तर सकाळी दोन तीन सेंटरवर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड आला होता. मात्र वेळीच पर्यायी मशिन लावून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीमानसी पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांना भेट
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी मंगळवारी सकाळी शहरातील इंजिन शेड, सिव्हिल लाईन येथील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी उमेदवारांचे काही प्रतिनिधी मतदान केंद्राच्या आत फिरताना आढळले. त्यांना त्यांनी चांगलेच फटकारले. तसेच उमेदवार आणि प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले.
अनेक उमेदवारांचा मतदान केंद्रावरच ठिय्या
निवडणूक आयोगाने उमेदवारांना एका मतदान केंद्राच्या आत केवळ चार वेळा प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. पण अनेक मतदान केंद्रावर या नियमाचे उल्लघंन केले जात असल्याचे चित्र पाहयला मिळाले. अनेक उमेदवार मतदान केंद्राच्या आत बाहेर ये-जा करीत होते तर काही उमेदवारांनी मतदान केंद्राच्या आतच ठिय्या मांडला होता. यामुळे नियमाचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे चित्र होते.






