नवीन गटशिक्षणाधिकारी रूजू होण्यापूर्वीच बदली
गोंदिया : आमगाव तालुक्यात ऐन 10-12 वी च्या परीक्षेच्या तोंडावर असताना 10 ते 15 शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. हा सर्व प्रकार नवीन गटशिक्षणाधिकारी कुसूम पुसाम यांच्या रूजू होण्यापूर्वीच करण्यात आला. त्यामुळे पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे तर आमगाव तालुक्यात अनेक चर्चांना पेव फुटले आहे. दरम्यान, त्या शाळेत शिकत असलेल्या पाल्यांच्या पालकांनी त्या शिक्षकांना परत आणण्याची मागणी केली आहे.
वास्तविक मार्च महिन्यापासूनच जिल्हा परिषद शाळांतील परिक्षेच्या तयारीला सुरवात होत असतानाच आणि आधिच ज्या शाळेतून या शिक्षकांना इतर शाळेत हलविण्यात आले, त्या शाळेत सदर शिक्षक गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी प्रतिनियुक्तीकरीता कुठल्या नेत्याकडे पाठपुरावा केला होता का याचाही तपास करण्याची वेळ आली आहे. सोबतच फेबुवारी महिन्यात प्रतिनियुक्तीच्या नावावर हलविण्यात आलेल्या शिक्षकांना परत त्याच शाळेत पाठविण्यात यावे असा सुर येऊ लागला आहे. या प्रतिनियुक्ती संदर्भात आमगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती कुसूम पुसाम यांना विचारणा केली असता त्यांनी आपण रुजू होण्याआधीच असा प्रकार घडला असल्याचे आपल्या लक्षात आल्याचे सांगितले. तसेच त्या प्रतिनियुक्त्या रद्द करुन पुर्वीच्याच शाळेत पाठविण्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांना विचारणा केल्यावर फेबुवारी महिन्यात प्रतिनियुक्ती झाल्याचे एैकून चौकशी करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे श्रीमती पुसाम यांच्या पुर्वी ज्यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार होता, त्यांची सखोल चौकशी याप्रकरणातच नव्हे तर त्यांच्या कार्यकाळातील इतर प्रकरणाचीही करण्याची गरज झाली आहे.
आमगाव तालुक्यात चर्चांना पेव
आमगाव पंचायत समित अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची परीक्षतेच्या तोंडावर प्रतिनियुक्ती करण्यात आली. हा प्रकार नवीन गटशिक्षणाधिकारी कुसूम पुसाम यांच्या रूजू होण्यापूर्वीच करण्यात आला. त्यामुळे आमगाव तालुक्यात विविध चर्चांना पेव फुटले आहे.