गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर येथील पुनर्वसित सर्व नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात सोमवार 1 नोव्हेंबर रोजी मोठा निर्धार करत गुरुवार 4 डिसेंबर रोजी कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरु करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली. गावकर्यांच्या 16 मूलभूत मागण्या आजतागायत अपूर्णच राहिल्याने नागरिकांमध्ये शासन, प्रशासन विरोधत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
गावकर्यांनी मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांसह संबंधित अधिकार्यांना निवेदनाद्वारे मागण्यांची माहिती देत वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे शासनाने दिशाभूल केली, आता आम्हीच ठाम भूमिका घेणार, असा पवित्रा गावकर्यांनी सोमवारी झालेल्या सभेत घेतला आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक, अन्यथा 4 डिसेंबरला मूळ गावी परत जाऊन शेती करू. शासन कितीही हवेत बसून निर्णय घेत असो, आमचे जीवन मात्र अडचणीत आहे. असे श्रीरामनगरवासींचे म्हणणे आहे. सन 2012 मध्ये पुनर्वसन, त्यानंतरची 13 वर्षे आणि पूर्ण न झालेल्या मागण्यांमुळे आता गावकरी निर्णायक भमिका घेण्याच्या तयारीत आहेत. शासनाने त्वरित हस्तक्षेपकरून श्रीरामनगरवासींच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी एकमुखी मागणी गावकर्यांनी केली आहे.






