Monday, January 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल महोत्सव उपयुक्त : जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल महोत्सव उपयुक्त : जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन
गोंदिया : समाजाच्या मुख्य प्रवाहातील बालकांना शिक्षण, कला व कौशल्य विकासाच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. मात्र निराधार व निराश्रित बालकांना या संधी हमखास मिळतीलच असे नाही. अशा बालकांच्या कला, क्रीडा व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे यांनी केले. महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जेठाबाई माणिकलाल हायस्कुल, गणेशनगर, गोंदिया येथे आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आज (ता.10) उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी वैद्यकीय अधिकारी विनोद जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तिरोडा विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक (दामिनी पथक) पुजा सुरळकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष देवका खोब्रागडे, बाल न्याय मंडळाच्या सदस्य  वंदना दुबे, बाल निरीक्षणगृहाच्या अधिक्षीका मनिषा आंबेडारे, विधी सेवा प्राधिकरणच्या अॅड.शबाना अन्सारी, अॅड.रोशनी पटले व जेठाभाई माणिकलाल हायस्कुलचे शिक्षक एस.बी.पटले मंचावर उपस्थित होते. किर्तीकुमार कटरे म्हणाले, बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा बाल महोत्सवांची नितांत गरज आहे. कोणतीही स्पर्धा ही निकोप असावी. बालकांनी जीवनात सातत्य, चिकाटी व जिद्द हा गुण अंगिकारला तर निश्चितच यश प्राप्त होतो. बालकांनो, पंख बजबूत ठेवा व उंच भरारी करा असे सांगून ते पुढे म्हणाले, 1 ते 13 जानेवारी पर्यंत जिल्ह्यात एकल महिलांचा शोध घेण्यात येत आहे. 1 जानेवारीपासून आजपर्यंत जिल्ह्यात 50 हजार एकल महिलांचा शोध लागलेला आहे, तसेच 6 हजार एकल बालकांचा (बालसंगोपन) शोध लागलेला असून त्यांना शासनाकडून लाभ मिळणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी शासकीय बालगृह, निरीक्षणगृहातील अनाथ, निराधार, निराश्रीत मुले व बाह्य शाळेतील बालकांमध्ये एकमेकांशी आदर, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी 2025-26 या वर्षाकरीता जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन दि.10 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात येत असल्याचे सांगितले. बाल महोत्सव म्हणजे बालकांचा कार्यक्रम. जी बालके आपल्या मुलभूत हक्कांपासून वंचित आहेत अशा बालकांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, हा एक स्तुत्य उपक्रम आहे. ‘बालविवाह मुक्त भारत’ हा उपक्रम शासनाने सुरु केलेला आहे, या उपक्रमास सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे विनोद चौधरी यांनी सांगितले.
कोणत्याही बालकांना जर कोणी अनोळखी व्यक्ती त्रास देत असेल अथवा त्यांचा छळ करीत असेल तर त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 यावर संपर्क साधावा. तसेच पोलीस दामिनी पथकाच्या हेल्पलाईन नंबर 112 यावर संपर्क साधून मदत घ्यावी असे पोलीस उपनिरीक्षक पुजा सुरळकर म्हणाल्या. यावेळी देवका खोब्रागडे, वंदना दुबे व शबाना अन्सारी यांनीही बालकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रजनी रामटेके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर पटले, रविंद्र टेंभुर्णे, अनिल बांबोळे, कल्याणकुमार रामटेके, मुकेश पटले, भुषण भेलावे, भागवत सुर्यवंशी, नरेश लांजेवार, राकेश नानोटे, पुजा डोंगरे, जयश्री कापगते, विनोद दुधकुवर, अलका बोकडे यांनी सहकार्य केले. यावेळी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments