देवरी तालुक्यातील पदमपूर येथील घटना
गोंदिया : गावालगत असलेल्या मुरमाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ९ जानेवारी २०२६ रोज शुक्रवारला सकाळी अंदाजे ७:०० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. सदर घटना देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिरपूर बांध अंतर्गत ग्राम पदमपुर येथील आहे. आसाराम झिटु आचले वय ५६ असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील ग्राम पदमपुर येथील मृतक आसाराम झिटु आचले हा इसम ८ जानेवारी २०२६ रोज गुरुवारच्या सकाळी ९ वाजे दरम्यान गावालगत असलेल्या मुरूम खड्ड्यानजीक प्रातःविधी करण्याकरिता गेला होता. मृतक दिवसभर घरी न आल्याने, गावात पुनर्विवाह चा कार्यक्रम असल्यामुळे मृतक हा वऱ्हाड्यांसह वराती सोबत गेला असेल असा कुटुंबातील सदस्यांना अंदाज होता. परंतु, कार्यक्रम आटोपून लग्न मंडळी गावात परत आली. पण, आसाराम घरी परत आलाच नाही. त्यामुळे सायंकाळ दरम्यान कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध केला. पण कुठेच त्याचा शोध लागला नाही. ९ जानेवारी २०२६ रोज शुक्रवारच्या सकाळी ७:०० वाजे दरम्यान गावातील एक व्यक्ती त्याच मुरूम खड्ड्याकडे प्रातःविधी करण्याकरिता गेला असता, त्याला खड्ड्यातील पाण्यामध्ये एक व्यक्ती मरण पावलेला दिसला. त्यांनी ही माहिती गावात सांगितली. गावकरी मुरूम खड्ड्याजवळ गोळा होऊन मृतकाला पाण्याबाहेर काढले. सदर घटनेची माहिती पोलीस ठाणे देवरी येथे देण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचून सदर घटनेचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले. मृतक हा मिर्गीच्या बिमारीने ग्रस्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.






