रस्ता दुरूस्तीसाठी बोरावासी रस्त्यावर; दोन दशकांपासून रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

0
172

गोंदिया : वारंवार रस्ता दुरूस्तीची मागणी करूनही रस्ता दुरूस्त करण्यात न आल्याने २१ जून रोजी शेकडो नागरीकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध करून तीव्र संताप व्यक्त केला.
तिरोडा तालक्यातील बोरा ते परसवाडा या तीन किमी रस्त्याचे २० वर्षापुर्वी खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. आज या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे तर सोडा पायी चालणे कठीण झाले आहे. बोरा, सोनेगाव, डब्बेटोला, काचेवाणी आदी गावांसाठी हा रस्ता अतिमहत्वाचा आहे. परसवाडा गाव परिसराच्या केंद्रस्थानी असून येथे माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा, दोन राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, व्यापारी प्रतिष्ठाणे आहेत. त्यामुळे येथून विद्यार्थी, नागरिक, शेतकरी यांची नेहमी वर्दळ असते. रस्ता दुरूस्ती अभावी ठिकठिकाणी निकामी झाला आहे. ग्रामपंचायत व स्थानिकांनी अनेकदा बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांना रस्ता दुरूस्तीसाठी निवेदन दिले. मात्र आश्वासनांच्या गाजराशिवाय काही मिळाले नाही. रस्ता दुरूस्तीच्या नावावर लाखो रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात जिप सदस्य पवन पटले यांनी सहा महिन्यात रस्ता दुरूस्तीची ग्वाही दिली होती. त्यांचे प्रयत्नही निष्पळ पडले.
बोरा-परसवाडा रस्ता परसवाडा-धापेवाडा-गोंदिया मार्ग व तिरोडा-अर्जुनी-बालाघाट या आंतरराज्यीय मार्गाला जुळतो. हा रस्ता महत्वाचा असूनही लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग दुरूस्तीसाठी गंभीर नाही. अखेर ग्रामस्थांच्या संयमाचा बांध टुटला व त्यांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दरम्यान कुणीही जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही. बांधकाम विभागाच्या अभियंत्याने भ्रमणध्वनीवरून रस्ता दुरूस्तीसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरवात करण्यात येणार असल्याचे सांगीतल्यानंतर आंदोलन तुर्तास थांबविण्यात आले. प्रसंगी चार दिवसांत रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी बोरावासीयांनी प्रशासनाला दिला. यावेळी सरपंच राखी नागपूरे, तंमुस अध्यक्ष संदेशसिंग हिरापूरे, माजी जिप सदस्य डॉ. योगेंद्र भगत, माजी सरपंच प्रेमलाल पटले, पोलिस पाटील छत्रपती पटले, सामाजिक कार्यकर्ता अजाबलाल नागपूरे, रंजीत नागपूरे, दिनेश चौधरी, संतोष पटले यांच्यासह शेकडो बोरावासी महिला, पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here