गोंदिया : शहरातील गोरेगाव मार्गावरील रूलेट कॅसिनोवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकली. या कारवाईत कॅसिनोच्या नावावर जुगार खेळविणार्या आरोपीला इमरान लियाकत अली (28, रा. गोविंदपूर) याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय चौरसिया (35, रा. सिव्हिल लाईन) फरार आहे.
पॉलिटेक्निक महाविद्यालयासमोर रूलेट कॅसिनोमध्ये रूलेट ऑनलाईन गेमच्या नावावर ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी रूलेट कॅसिनोवर धाड टाकून ऑनलाईन जुगार खेळविताना आरोपीला पकडले. त्याच्याकडून एक हजार रूपये व एक मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणात फरार मुख्य आरोपी संजय चौरसिया याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अहिरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राजूरकर, पोलिस हवालदार राजू मिश्रा, गायधने, तिवारी, महेश मेहर, छगन विठ्ठले, राकेश इंदूरकर यांनी केली.



