गोंदिया : लोकशाहीमध्ये निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कार्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आज निवडणूक विषयक पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी तिरोडा येथे प्रशिक्षणाला भेट देऊन उपस्थितांना संबोधित केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, तहसीलदार नारायण ठाकरे, तहसीलदार प्रज्ञा बोखरे यांची उपस्थिती होती. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामाला गती आली असून निवडणूक विभाग ॲक्शन मोडमध्ये आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडा आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हा असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी प्राधान्याने करावयाच्या बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी सर्व यंत्रे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर मॉकपोल घेणे. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये व यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. गोंदिया येथे आयोजित प्रशिक्षणाला अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित्यांना मार्गदर्शन केले. आमगाव येथे आयोजित प्रशिक्षणाच्या दोन्ही सत्रांमध्ये अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची उपस्थिती होती.
अर्जुनी-मोरगाव येथे मतदानाचे पहिले प्रशिक्षण संपन्न
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जूनी-मोरगाव येथे मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. सदर प्रशिक्षणास अर्जुनी/मोरगाव सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अनिरुद्ध कांबळे व सडक-अर्जूनी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम व इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.