Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedविश्व कल्याण हेच संघाचे उद्देश्य : रवींद्र किरकोळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी व...

विश्व कल्याण हेच संघाचे उद्देश्य : रवींद्र किरकोळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव

गोंदिया : नवरात्रोत्सवाचा दहा दिवसांचा कालावधी हा नेहमी सनातन सत्याचाच निर्णायक विजय होत असल्याचे सांगतो. संघर्षाचा स्वरुप समाजात नेहमीच राहणार व यात मर्यादीत शक्ति असणार्‍यांचा सदैव विजय होतो. संघ हा शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. परंतु आपण जुबली किंवा महोत्सव साजरा करीत नाही. डॉ. हेडगेवार यांनी बघीतलेले स्वप्न हे मुल्ययुक्त व आत्मगौरवापासून मुक्त आदर्श समाज निर्माण करण्याचे होते. हे आपण ‘याची देही याची डोळा’ बघत असून संपूर्ण विश्वाचे कल्याण हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्देश्य असल्याचे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य रवींद्र किरकोळे यांनी केले. ते शहरातील गौतमनगरातील श्री सरस्वती शिशू मंदिरच्या प्रांगणात आयोजित श्री विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रोहित झा, विभाग संघचालक दलजितसिंह खालसा, नगर संघचालक मिलींद अलोणी उपस्थित होते.
किरकोळे पुढे म्हणाले, संघ वाढण्याच्या प्रमुख कारणांमध्ये डॉ. हेडगेवार यांनी सांगीतलेला सत्याचा सिद्धांत, आपण हिंदू व प्राचिन राष्ट्र असल्याचे सत्य ठणकावून सांगणे व जे सत्य सांगीतले त्यावर स्थिर राहण्याची ताकद आहे. जाती, प्रांत व भाषा आपली ओळख नसून हिंदू ही आपली ओळख आहे. तसेच राष्ट्र सेवेला चरित्रासोबत त्यांनी जोडले. शताब्दीच्या या काळात पाच प्रमुख गोष्टिंवर संघाचे कार्य समाजात सुरू आहे. यात सामाजिक समरसता निर्माण करणे, परिवार प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, नागरिक अनुशासन व ‘स्व’चे जागरण या बाबींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे हे वर्ष देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे आहे. त्यांचे जीवन भारतीय इतिहासाचा स्वर्णिम पर्व आहे. त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणेचे महान स्त्रोत असल्याचे किरकोळे म्हणाले. प्रसंगी रोहित झा म्हणाले, मी बालपणापून संघाचा स्वयंसेवक असल्याने याचा माझ्या आयुष्यात मला खूप लाभ झाला आहे. मागील दहापंधरा वर्षापासून समाजात, देशात जे बदल होताना आपण बघत आहोत ते सुखावणारे आहे. आजचा युवक व्यसनांच्या आहारी चालला आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. दरम्यान स्वयंसेवकांनी नियुद्ध, आसन व योगचे प्रात्याक्षिक सादर केले. तत्पुर्वी गौतमनगर, वाजपेयी वार्ड, मुर्री रोड आदी प्रमुख मार्गावरून स्वसंसेवकांनी पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन नगर कार्यवाह शरद काथरानी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील गणमान्य नागरिक व मातृशक्ती उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments