गोंदिया : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स (सीसीएमपी) पूर्ण केल्यानंतर ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देऊन त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा घेतलेला निर्णयाचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) विरोध करीत आहे.यावर होमिओपॅथी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला असून, आयएमएची भूमिका अन्यायकारक आणि सर्वसामान्यांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला आहे.सरकारने आयएमएच्या दबावात निर्णय घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशाराही होमिओपॅथीक इंटीग्रेटेड मेडीकल प्राक्टिशनर्स असो.गोंदियाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष डाॅ.संजय देशमुख, सचिव डाॅ.डी.एम.सुरासावत, डाॅ.सचिन चौधरी, डाॅ.साजिद खान यांनी पत्रपरिषदेतून दिली आहे.
निर्णयामागील पार्श्वभूमी आणि शासनाची भूमिका
केंद्र सरकारने यापूर्वी आयुर्वेद अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास मान्यता दिली होती. याच धर्तीवर, आता महाराष्ट्र राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) हा ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामागे, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे हा उद्देश असल्याचे सरकारकडून सूचित केले जात आहे. १५ जुलै २०२५ पासून हा आदेश लागू करण्याचा निर्णय शासनाने कायम ठेवला असून नोंदणी करण्याचे आवाहन सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डाॅक्टरांना करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाच्याविरोधात एमबीबीएस डाॅक्टरांची असलेली संघटना आयएमएने केल्याने पेच निर्माण झालेला आहे.राज्यसरकारने १५ जुर्लेपासून नोंदणी सुरु न केल्यास १६ जुर्लेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनास सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत डाॅ.देशमुख यांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यातच आयएमएने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने यावर कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.तर ९ जुर्ले २०१५ मध्ये मा.न्यायाधिश ए.के.सिक्री व न्या.रोहिंटन फाली नरिमन यांनी आयएमए पुणे शाखेने दाखल केलेली याचिका सुध्दा फेटाळून लावली आहे.त्यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे,असे सांगून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आयएमए करीत असून प्रसारमाध्यमातून खोट्या व चुकीच्या माहिती देत होमिओपॅथीक डाॅक्टरांचा अवमान करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीसीएमपी कोर्स
सीसीएमपी कोर्स हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीचे मर्यादित प्रमाणात मूलभूत ज्ञान मिळावे यासाठी तो तयार करण्यात आला आहे.तो अभ्यासक्रम सुध्दा आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत येत असलेल्या एमबीबीएस डाॅक्टरांनीच केले असून वैद्यकीय महाविद्यालयात ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम पुर्ण करुन घेतलेल्या परिक्षेत उत्तीर्णही होमिओपॅथीचे डाॅक्टर झालेले आहेत.८ जुर्ले २०१४ रोजी प्रकाशित महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आलेली आहे.गेल्या ८ वर्षापासून सदर अभ्यासक्रम सुरु असून राज्यात ९१६० होमिओपॅथिक वैद्यकिय व्यवसायिकांनी हा अभ्यासक्रम यशस्विरित्या पुर्ण केलेला आहे.विशेष म्हणजे आजही अनेक रुग्णालयात आरएमओची जबाबदारी सांभाळणारे आमच्यासारखेच डाॅक्टर असतात असेही ते म्हणाले.तर कोरोना काळात ग्रामीण भागात होमिओपॅथिक डाॅक्टरांनीच सेवा केल्याचेही डाॅ.साजिद खान म्हणाले.विशेषतः आपत्कालीन परिस्थितीमध्ये, जिथे त्वरित आणि अचूक निदानाची तसेच उपचारांची आवश्यकता असते, तिथे केवळ मर्यादित ज्ञान असलेल्या डॉक्टरांकडून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,असा चुकिचा भ्रम आयएमए निर्माण करीत असल्याचेही ते म्हणाले.या पत्रपरिषदेला डाॅ.भुवन लांजेवार,डाॅ.मोहित गौतम,डाॅ.मृणाल पटले,डाॅ.महेश नाकाडे,डाॅ.विवेक मेंढे,डाॅ.अजय उमाटे,डाॅ.टी.डी.कटरे,डाॅ.अनिल चौरागडे,डाॅ.सुरेंंद्र रहागंडाले,डाॅ.रुपसेन बघेले,डाॅ.प्रदिप रोकडे,डाॅ.ललीत कलंत्री,डाॅ.महेश लोथे,डाॅ.हेमराज अरसोडे,डाॅ.गजानन चुटे,डाॅ.गिरीश पारधी.डाॅ.गगन वर्मा,डाॅ.विनोद इलमकर,डाॅ.अभय़ बोरकर,डाॅ.लक्ष्मीकांत चांदेवार,डाॅ.अजय बेलानी,डाॅ.रुपेश परशुरामकर,डाॅ.दिलीप पनपालिया,डाॅ.कुशल राॅय यांच्या मोठ्या संख्येने होमिओपॅथी डाॅक्टर उपस्थित होते.






