…चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी राष्ट्रभक्ती व एकात्मता आवश्यक : जिल्हाधिकारी प्रजित नायर
गोंदिया : सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम् सस्यश्यामलाम्, मातरम् ……वंदे मातरम्…… वंदे मातरम्….. ने निनादले गोंदियाचे इंदिरा गांधी स्टेडियम. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्र गाणला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामूहिक वंदे मातरम् गीत गाण्यात आले. चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी आज ‘वंदे मातरम्’च्या सामुहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंदिरा गांधी स्टेडियम, गोंदिया येथे आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ‘वंदे मातरम्’ सामूहिक गायनाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसिलदार समशेर पठाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सारंग पटले, दलजीतसिंग खालसा, आय.एम.सी. गोंदियाचे अध्यक्ष डॉ.विजय गंदेवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी.एन. तुमडाम उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आपण आज एैतिहासिक दिन साजरा करीत आहोत. ‘वंदे मातरम्’ या शब्दात देशप्रेम आहे. दीडशे वर्ष झाली तरी, आजही ‘वंदे मातरम्’ एकप्रकारे आपल्या भारताला दिशा देणारे गीत आहे. या गीतामध्ये आपल्या मातृभूमीचे वर्णन केलेले आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जाती, पंथ, धर्म, भाषा सगळे भेद विसरून प्रत्येकाने वंदे मातरम् म्हटले. ‘वंदे मातरम्’ हे कुठल्याही एका धर्माचे गीत नाही. सर्व धर्मांना प्रेरणा देणारे प्रेरणागीत, राष्ट्रगीत आहे असे त्यांनी सांगितले.
दलजितसिंग म्हणाले, ‘वंदे मातरम्’ या गीताला यावर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत असून हे वर्ष अर्ध शताब्दी महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. ‘वंदे मातरम्’ या गीताने सर्व समाज एकत्रित होते. आपण आपल्या नागरिक कर्तव्याचे पालन केले पाहिजे, स्वच्छतेचे पालन करावे व पर्यावरणाचे रक्षण करावे, तरच आपण ‘वंदे मातरम्’ला सार्थक केले असे मला वाटते.
तहसिलदार समशेर पठाण म्हणाले, आज ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असून आपण त्याचा गौरव दिन म्हणून साजरा करीत आहोत. हे केवळ गीत नसून ही एक प्रेरणा आहे, हे बलिदानाचे प्रतिक आहे. ‘वंदे मातरम्’ या गीताने सर्वांना जोडण्याचे काम केले. या गीताला शब्दातून नव्हे तर आपल्या कृतीतून देशसेवा करावी. या गीताचा सन्मान करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या देशभक्तांनी आपले बलिदान दिले त्यांना स्मरण करावे असे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते थोर कादंबरीकार, संपादक, कवी व तत्वज्ञ बकीमचंद्र चटोपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गटनिदेशक ए.ए. शिंदे, जी.एम. श्रीगिरीवार, श्रीमती जे.एस. धोटे, पी.एल. कटरे, जिल्हा गडकिल्ले समितीचे अध्यक्ष मनोज रहांगडाले, साहित्यिक महेंद्र सोनवाने, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पनिदेशक विनोद नांदगाये यांनी केले. सुत्रसंचालन अश्विनी सरोदे व नेहा पोवार यांनी संयुक्तपणे केले, तर उपस्थितांचे आभार प्रिती काशिद यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






